गांधीनगर : गुजरात (Gujarat) काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत नाराजी समोर आली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्षावर टीकेची झोड उठवल्यानंतर राजकारण तापलं आहे. त्यातच त्यांनी भाजपचं (BJP) तोंडभरून कौतुक केल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यातच आता त्यांच्यावर राज्यातील भाजप सरकार मेहरबान झालं आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं घेतलेल्या भूमिकेमुळे हिंसाचाराच्या एका प्रकरणातून पटेलांची सुटका झाली आहे. (Hardik Patel Latest News in Marathi)
पाटीदार आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचार प्रकरणी हार्दिक पटेलांच्या विरोधात दाखल खटला मागे घेण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने हार्दिक पटेलांसह इतर 18 जणांना या खटल्यातून मुक्त केलं आहे. राज्य सरकारनेच हा खटला मागे घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. भाजप सरकारने पटेल यांच्या विरोधात 2017 मध्ये रामोल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पटेल यांच्यासह इतरांना भाजप नगरसेवकाच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली होती.
आता राज्यातील भाजप सरकारने पाटीदार आंदोलनावेळी दाखल खटले मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. याचाच फायदा हार्दिक पटेल यांना झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या आधीचा मुहूर्त यासाठी निवडण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पटेल हे काँग्रेसवर नाराज असताना त्यांच्यावर भाजप सरकार मेहरबान झाल्याचे दिसत आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी हे गुजरात दौऱ्यावर असल्यानं राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
हार्दिक पटेल यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केला होता. त्याचवेळी त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली होती मात्र, त्यांनी तोंडभरून भाजपचे कौतुक केले होते. यामुळे पटेल हे भाजपशी जवळीक साधू शकतात, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली आहे. ते म्हणाले होते की,भाजपने मागील काही काळात घेतलेल्या निर्णय राजकीय हेतून घेतले आहेत. असे असले तरी त्यांच्यात निर्णय घेण्याची ताकद आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. भाजपची बाजू न घेता अथवा त्यांची स्तुती न करताही या सत्य गोष्टी आपण स्वीकारायला हव्यात. गुजरातमध्ये काँग्रेसला भक्कम व्हायचे असेल तर आपण निर्णय क्षमता वाढवायला हवी.
पटेल यांनी नुकताच पक्षावर आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला होता. नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधून ते बाहेर पडू शकतात, अशी चर्चा गुजरातमध्ये सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झालं आहे.काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर मात्र, पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.