बिहारसोबत जम्मू-काश्मीरमधील नगरोटा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत पुन्हा एकदा ‘कमळ’ फुलवलं आहे. दिवंगत आमदार देवेंद्र सिंह राणा यांच्या कन्या आणि भाजप उमेदवार देवयानी राणा यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने हरवून ही जागा पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आणली आहे. या विजयामुळे बिहारमधील विजयानंतर भाजपला आणखी एका राज्यात मोठा दिलासा मिळाला आहे.
नगरोटा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या देवयानी राणा यांनी तब्बल 42,350 मतं मिळवून विजय खेचून आणला आहे. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे उमेदवार हर्ष देव सिंह यांचा 24,647 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या मतदारसंघात 11 नोव्हेंबर रोजी 75.08 टक्के मतदान झाले होते, तर शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.
अखेरीस देवयानी राणा यांनी 42,350 मते मिळवत विजय मिळवला. त्यांच्या या विजयानंतर राणा कुटुंबात आणि समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मतमोजणीतील सुरुवातीच्या आघाडीचे संकेत मिळताच भाजप समर्थकांनी केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमा होऊन जल्लोष सुरू आहे.
विजयानंतर देवयानी राणा म्हणाल्या, "नगरोटा मतदारांनी ज्या विश्वासाने राणा साहेबांना आशीर्वाद दिले, त्याच प्रेमाने आज मला स्वीकारले. मी त्यांची आभारी आहे. भाजप जेव्हा निवडणूक लढवते, ते जिंकण्यासाठीच लढवते. त्याचेच उदाहरण नगरोटासह बिहारच्या निकालात दिसत आहे."
2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत याच नगरोटा मतदारसंघातून देवयानी राणा यांचे वडील देवेंद्र सिंह राणा भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र, निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आणि पोटनिवडणूक घेण्यात आली. वडिलांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर भाजपने त्यांची कन्या देवयानी राणा यांना उमेदवारी दिली होती. वडिलांप्रमाणेच देवयानी राणा यांनीही हा विजय मिळवत ही जागा पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात आणली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.