Udaynidhi Stalin Sarkarnama
देश

Cabinet Expansion : 15 महिने जेलमध्ये, बाहेर आल्यानंतर लगेच मंत्री; तमिळनाडूत नव्या पर्वाचा ‘उदय’

Udayanidhi Stalin MK Stalin Senthil Balaji : उदयनिधी यांची उपमुख्यमंत्रीपदी बढती झाली आहे. तर रविवारी सेंथिल बालाजींसह चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Rajanand More

Tamil Nadu Politics : तमिळनाडूमध्ये पुढील दोन वर्षांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पुत्र उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री करत त्याची चुणूक दाखवली. तर दुसरीकडे 15 महिने तुरुंगात घालवलेल्या नेत्याला जामीनवर बाहेर आल्यानंतर दोन दिवसांतच मंत्री करण्यात आले आहे.

डीएमकेच्या चार आमदारांचा रविवारी शपथविधी पार पडला. उदयनिधीही यावेळी उपस्थित होते. बालाजी यांच्यासह गोवी छेजिआन, एस. एम. नासर आणि आर राजेंद्रन या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. बालाजी यांच्या ऊर्जा खाते देण्यात आले आहे.

तमिळनाडूतील आजचा कॅबिनेट विस्तार नव्या राजकीय पर्वाचा उदय म्हणून पाहिला जात आहे. सरकारमध्ये महत्वाचे पत मिळवलेले उदयनिधी हे त्यांच्या कुटुंबातील तिसरे सदस्य ठरले आहेत. त्यांचे आजोबा के. करुणानिधी आणि वडील एम. के. स्टॅलिन यांचे आतापर्यंत सरकारमध्ये सर्वोच्च स्थान राहिले आहे.

उदयनिधी यांना मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. उपमुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याआधी त्यांनी सोशल मीडियात म्हटले आहे की, ‘उपमुख्यमंत्री हे पद नव्हे तर माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे.’ त्यांनी करुणानिधी आणि पेरियार यांच्या स्मारकावर जाऊन आदरांजलीही वाहिली.

46 वर्षीय उदयनिधी यांच्यावरच पुढील निवडणुकीची धुरा असेल असे स्पष्ट संकेत एम. के. स्टॅलिन यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांच्या ज्येष्ट नेत्यांबाबतच्या विधानावरून चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर काही दिवसांतच उदयनिधी यांना बढती देण्यात आल्याने विरोधकांनीही जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

दरम्यान, डीएमकेमधील बडे नेते सेंथिल बालाजी यांना मंत्री करत स्टॅलिन यांनी भाजप आणि केंद्र सरकारला एकप्रकारे इशारा दिला आहे. बालाजी यांना 15 महिन्यांपूर्वी ईडीने अटक केली होती. सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच ते जेलबाहेर आले आहेत. त्यानंतर लगेच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT