Justin Trudeau Sarkarnama
देश

Justin Trudeau : भारतविरोधी अजेंडा चालवणाऱ्या पंतप्रधान ट्रुडो यांचा ‘गेम ओव्हर’; काय घडतंय कॅनडात?

Canada PM Resignation Justin Trudeau and Khalistani support : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे आपल्या पदाचा लवकरच राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे.

Rajanand More

New Delhi : खलिस्तानी प्रपोगंडा चालवत सातत्याने भारताला अंगावर घेणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांना हे कृत्य चांगलेच महागात पडले आहे. ट्रुडो हे लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते. त्यामुळे कॅनडातील राजकारणात पुढील काही दिवसांत उलथापालथ पाहायला मिळू शकते. खलिस्तानवाद्यांना कॅनडामध्ये संरक्षण असल्याचा आरोप भारताकडून केला जातो.

कॅनडातील वृत्तपत्र द ग्लोब एंड मेलने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रुडो हे लिबरल पक्षाचे नेतेपद सोडणार आहेत. येत्या बुधवारी एका महत्वपूर्ण राष्ट्रीय बैठकीआधीच ते राजीनामा देण्याची शक्यता आहे. पक्ष संकटात असताना त्यांनी 2013 मध्ये पक्षप्रमुख म्हणून पद स्वीकारले होते. त्यानंतर त्यांचा पक्ष पहिल्यांदाच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेला होता.

ट्रुडो यांनी 2015 च्या निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून दिला होता. त्यांच्या पक्षाला 338 पैकी 184 जागा मिळाल्या होत्या. 2011 मध्ये त्यांच्या पक्षाला केवळ ३४ जागा मिळाल्या होत्या. ट्रुडो हे अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाले होते. 2019 आणि 2021 च्या निवडणुकीतही त्यांचाच विजय झाला. पण मागील काही वर्षांत त्यांच्या काही धोरणांना देशात विरोध होताना दिसत आहे.

भारतविरोधी अजेंडा नडला

ट्रुडो यांचे राजकारण हे खलिस्तानवाद्यांना सहकार्याचे म्हणजे भारतविरोधी राहिल्याचे चित्र मागील काही महिन्यांत प्रकर्षाने पाहायला मिळाले. भारतविरोधी काम करणाऱ्या खलिस्तान्यांना त्यांच्या सरकारने संरक्षण दिले. कॅनडात हिंदूंच्या मंदिरांवरही अनेक हल्ले झाले. मात्र, त्यानंतरही ट्रुडो यांच्या सरकारने कठोर कारवाई केली नाही.

एवढेच नाही तर ट्रुडो यांनी भारतावरही गंभीर आरोप केले होते. दहशतवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे ट्रुडो म्हणाले होत. सप्टेंबर 2023 मध्ये त्यांनी संसदेत याबाबत भाष्य केले होते. भारत सरकारच्या एजंटांनी कॅनडातील नागरिकाची हत्या केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे कॅनडा आणि भारतातील संबंध ताणले गेले होते.

अमेरिकेत ड़ोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतरही ट्रुडो यांची वाटचाल कठीण बनली आहे. ट्रम्प यांनी कॅनडावर 25 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. त्याआधीपासूनच ट्रुडो यांच्या सरकारमध्येही नाराजी समोर आली होती. काही मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर ट्रुडो यांची लोकप्रियता कमी झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता ते राजीनामा देणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT