COVAXIN  
देश

कोव्हॅक्सिन लशीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

देशात कोरोनाची (Covid 19) दुसरी लाट ओसरली असून लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशात कोरोनाची (Covid 19) दुसरी लाट ओसरली असून लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. आतापर्यंत नागरिकांना 100 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. पण असे असले तरी काही राज्यांमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाणही अधिक आहे. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये लस घेण्यासाठी जाणाऱ्यांचे संख्याही रोडावली आहे. त्यातच केंद्र सरकारने कोव्हॅक्सिन (Covaxin) ही लस उत्पादित तारखेपासून वापरण्याची मुदत (Shelf Life) सहा महिन्यांऐवजी बारा महिने करण्याचा मोठा निर्णय आहे.

भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीकडून कोव्हॅक्सिन या लशीचे उत्पादन केले जाते. ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे. सध्या देशात कोव्हॅक्सिनसह कोविशिल्ड, स्पुटनिक, मॉडर्ना आणि जॉन्सन अॅन्ड जॉन्सन या लशींचा वापर केला जात आहे. मात्र, कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लशींचे उत्पादन सर्वाधिक आहे. कोव्हॅक्सिन या लशीची शेल्फ लाईफ आतापर्यंत सहा महिने एवढी होती.

भारत बायोटेक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल ड्रग्ज स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) कोव्हॅक्सिन लशीची शेल्फ लाईफ बारा महिन्यांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. लस उत्पादित केल्याच्या तारखेपासून पुढे बारा महिने ही लस वापरता येईल. कंपनीकडून लशीच्या वापराबाबतची अधिकची माहिती CDSCO ला देण्यात आली होती. त्यानंतर ही मान्यता मिळाली आहे.

दरम्यान, सरकारने काही महिन्यांपूर्वीच सिरमच्या कोव्हिशिल्ड लशीचा वापर करण्याची मुदत तीन महिन्याने वाढवली आहे. लशीच्या उत्पादित तारखेपासून ती सहा महिन्यांच्या आत वापरण्याचे बंधन आधी होते. आता ही मुदत नऊ महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. आफ्रिकेतील काही देशांमध्ये या पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत पुरतील एवढे दशलक्ष डोस होते.. त्यांची वापरण्याची मुदत न वाढवल्यास ते वाया जाणार होते. सिरमने औषध महानियंत्रक व्ही.जी.सोमानी यांच्याकडे लस वापरण्याची मुदत वाढवण्याची मागणी केली होती. कोव्हिशिल्ड विकसित करणाऱ्या अॅस्ट्राझेनेका कंपनीने ही लस सामान्य शीतकरण परिस्थितीत सहा महिने व्यवस्थित राहू शकते, असे नुकतेच स्पष्ट केले आहे.

देशात आतापर्यंत 100 कोटींहून डोस देण्यात आलेले आहे. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यात येणार असून डिसेंबर अखेरपर्यंत सर्व नागरिकांना किमान एक डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशभरातील लसीकरणामध्ये उत्तर प्रदेश व महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र, काही राज्यांतील जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा परिणाम एकूण लसीकरणावर होत असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT