New Delhi News: यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकारकडून 5 हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर केली होती. ते पैसे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमाही करण्यात आले आहेत. अशातच आता केंद्र सरकारनेही दुष्काळाच्या संकटकाळात शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने बुधवारी रब्बी 2026-27 हंगामासाठी 62,370 कोटी रुपयांच्या खत अनुदान पॅकेजला मंजुरी दिली आहे. मागील रब्बी हंगामात 37,952 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. त्या तुलनेत यंदा अनुदानाच्या रकमेत 64 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या पॅकेजअंतर्गत शेतकऱ्यांना डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) खताची गोणी पूर्वीप्रमाणेच 1,350 रुपयांना उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या या पॅकेजमध्ये 1 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीसाठी फॉस्फेटिक आणि पोटॅशिकखतांचे पोषक तत्त्व आधारित अनुदान दर निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय DAP खतासाठी विशेष आर्थिक मदत, ट्रिपल सुपर फॉस्फेट आणि मोनोअमोनियम फॉस्फेट खतांसाठीही या तरतुदींचा विस्तार, सिंगल सुपर फॉस्फेट खतासाठी वाहतूक अनुदान आणि अमोनियम सल्फेटवरील अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारने या अनुदानाच्या रकमेत वाढ केली आहे. यापाठीमागं जागतिक बाजारपेठेत खतांच्या किमतींमध्ये होणारे चढ-उतार आणि पश्चिम आशियातील संकटकाळात निर्माण झालेल्या पुरवठ्यातील अडथळ्यांच्याचं कारण आहे. तसेच रब्बी हंगामात खतांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करणे आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च स्थिर ठेवणे हाही या निर्णयामागचा उद्देश असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.
सरकारच्या या पॅकेजमुळे देशांतर्गत खत उत्पादनाला पुन्हा चालना मिळेल, आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि DAP ऐवजी SSP तसेच युरियाऐवजी अमोनियम सल्फेटसारख्या पर्यायी खतांचा वापर वाढेल, अशी सरकारला अपेक्षा आहे. त्यातून पिकांना आवश्यक पोषक घटकांचा संतुलित पुरवठा करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.