Covid Vaccination
Covid Vaccination Sarkarnama
देश

सर्वांना बूस्टर डोस अन् लहान मुलांनाही कोरोना लस; सरकारचा मोठा निर्णय

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा (Covid-19) संसर्ग रोखण्यासाठी कोरोना लशीचे (Covid Vaccine) दोन डोस दिले जात आहे. पण आता कोरोनापासून बचावासाठी बूस्टर डोस (Booster Dose) घ्यावा लागणार आहे. याबाबत पुढील 2 आठवड्यांत अधिकृत घोषणा होणार आहे. लहान मुलांना कोरोना लस देण्याबाबतही त्याचवेळी निर्णय जाहीर होईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणविषयक राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची बैठक पुढील दोन आठवड्यांत होणार आहे. सरकारने नागरिकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत बूस्टर डोस देण्याबाबतचा सर्वंकष आराखडा ठरवला जाणार आहे. याचबरोबर लहान मुलांना कोरोना लस देण्याचाही निर्णयही झाला असून, याची सुरवात जानेवारीपासून होणार आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आधीच याबाबत इशारा दिला होता. डॉ.गुलेरिया म्हणाले होते की, पुढील वर्षी कोरोमा लशीचा बूस्टर डोस आपल्यासाठी आवश्यक ठरू शकतो. पहिल्या दोन डोसच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल होणे आणि मृत्यू यापासून किती काळ संरक्षण मिळते हे पाहून तिसऱ्या डोस घ्यावा लागेल. अमेरिका, इस्राईल, ब्रिटन, युरोपीय समुदाय आणि संयुक्त अरब आमिरातीने तिसऱ्या डोसला परवानगी दिली आहे. ही परवानगी आधीच्या दोन डोसमुळे किती काळ कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळते यावर त्यांनी दिली आहे. यासाठी त्यांनी अँटीबॉडीजचा विचार केलेला नाही.

लहान मुलांना कोरोना लस देण्याचे डॉ.गुलेरिया यांनी समर्थन केले होते. ते म्हणाले होते की, अमेरिकेप्रमाणे आपल्या देशातही मुलांना कोरोना लस द्यायला हवी. लवकरच हे लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.

कोविशिल्ड लशीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिटूयटचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी तिसरा डोसही घ्यावा लागणार असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. माझ्यासह कंपनीतील कर्मचाऱ्यांनीही तिसरा डोस घेतल्याची कबुली देत त्यांनी इतरांनाही तिसरा डोस घ्यावाच लागेल, असे म्हटले होते. भारतात सध्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन यांसह पाच लशी उपलब्ध आहेत. यापैकी कोणतीही लस घेतली तरी त्याचे दोन डोस घ्यावे लागतात. दुसरा डोस बूस्टर डोस म्हणून गृहित धरला जातो. पण पूनावाला यांनी आता तिसरा डोसही घ्यावा लागणार असल्याचे म्हटले होते. लशीमुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजचे प्रमाण काही दिवसानंतर कमी होत जात असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT