BJP News, 16 Aug : भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राजस्थानमध्ये होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने बावनकुळे यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी या नियुक्तीची घोषणा केली आहे.
राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाने प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती करत संघटनात्मक पातळीवर जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. माजी खासदार हरीश द्विवेदी यांच्याकडे प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 5 नेत्यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेल्या बावनकुळे यांना पक्षसंघटनेचा मोठा अनुभव आहे. त्यामुळेच राजस्थानमधील निवडणूक तयारीसाठी भाजपने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याचं बोललं जात आहे. यापूर्वीही भाजपकडून बावनकुळे यांच्याकडे राज्याबाहेरील महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती.
मार्च 2026 मध्ये ओडिशातील राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप करत आहेत.
बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिल्याचा आरोप जरांगे करत आहेत. महाराष्ट्रात हे सर्व आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच भाजपने बावनकुळे यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे बावनकुळे यांची निवड सध्या चर्चेचा मुद्दा ठरली आहे.
दरम्यान, या नव्या नियुक्तीवर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजस्थानमध्ये होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी माझ्यावर सहप्रभारी म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन तसेच पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार.
पक्षाने आजवर सोपविलेली प्रत्येक जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पण भावनेने पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच भावनेने राजस्थानमधील ही नवी जबाबदारीही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन, असं म्हणत बावनकुळे यांनी पक्षाचे आभार मानले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.