chhattisgarh cm bhupesh baghel says no to rotational cm 
देश

अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचं आधी काहीच ठरलेलं नाही!

काँग्रेससची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये आता मुख्यमंत्रिपदावरून संघर्ष पेटला आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेससची (Congress) सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) आता मुख्यमंत्रिपदावरून (Chief Minister) संघर्ष पेटला आहे. विद्यमान सरकारमधील आरोग्यमंत्री असलेले टी. एस. सिंहदेव (T.S.Singh Deo) यांनी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी सांगितली आहे. सिंहदेव आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) या दोघांनीही दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. यानंतर बघेल यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठा खुलासा केला आहे.  

दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन राज्यात परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. विमानतळावर घोषणाबाजीही करण्यात आली. या वेळी बोलताना ते म्हणाले की, अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची चर्चा घडवून आणणारे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते यात कधीही यशस्वी ठरणार नाहीत. मी आधीही सांगितले आहे की हाय कमांड आदेश देईल त्यावेळी राजीनामा देईन. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माझ्यासारख्या शेतकऱ्यावर सरकारची जबाबदारी टाकली आहे. मी याबाबत समाधानी आहे. हे सरकार शेतकरी, आदिवासी, कामगार आणि राज्यातील 2.8 कोटी जनतेचे आहे. 

राहुल गांधी यांनी काल (ता.25) बघेल आणि सिंहदेव यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या दोन्ही बैठका सुमारे तीन तास चालल्या. या वेळी काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल आणि छत्तीसगडचे प्रभारी के.एल.पुनिया उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली. यानंतर सिंहदेव यांनी बंडखोरीची तलवार म्यान केल्याचे समजते. पक्षांतर्गत मतभेदांवर उपाय काढण्यासाठी पक्ष नेतृत्व यापुढेही काही बैठका घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

या बैठकीमध्ये राज्यातील मुख्यमंत्री बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही,  असे प्रभारी पुनिया यांनी बैठकीनंतर सांगितले. राहुल गांधीं यांच्यासोबत आज बैठक झाली. छत्तीसगडमधील विकासकामांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली, असे सांगून बघेल यांनी मूळ मुद्द्याला बगल दिली. परंतु, दोन्ही नेत्यांची राहुल गांधींनी समजूत काढल्याचे समजते. 

राज्यातील मुख्यमंत्री बघेल सरकारने अडीच वर्षांचा कालावधी जून महिन्यात पूर्ण केला. यानंतर सिंहदेव आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्रिपदासाठी दबाव आणण्यास सुरवात केली. राज्यात काँग्रेसची सत्ता डिसेंबर 2018 मध्ये आल्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता, असा दावा ते करीत आहेत. यावर बघेल यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. अडीच वर्षांसाठी पदाचे वाटप आघाडी सरकारमध्ये असते. छत्तीसगडमध्ये मात्र काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळाले असल्याचा युक्तिवाद बघेल यांनी केला आहे. सोबतच मुख्यमंत्रिपदाबाबत पक्ष नेतृत्वाचा निर्णय अंतिम असेल, असे सांगून त्यांनी या वादाचा चेंडू पक्ष नेतृत्वाच्या दरबारी टोलावला होता. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT