Uddhav Thackeray and Narendra Modi
Uddhav Thackeray and Narendra Modi  Sarkarnama
देश

पेट्रोल, डिझेल कुणामुळं महाग? मुख्यमंत्री ठाकरेंनी मोदी सरकारला आकडेच दाखवले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. इंधन दरवाढीवरून ओरड सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आता थेट विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या महाराष्ट्रासह राज्यांकडं बोट दाखवलं होत. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट आकडेवारी समोर मांडून मोदी सरकारला आरसा दाखवला आहे. (Petrol Diesel price hike News)

पेट्रोल, डिझेल दरवाढीसाठी मोदींनी विरोधी पक्षांचेे सरकार असलेल्या राज्यांना जबाबदार धरल्याने आता राजकारण तापले आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट आकडे सादर करीत मोदींचा दावा खोडून काढला आहे. राज्यामुळं पेट्रोल, डिझेल महागलं ही वस्तुस्थिती नाही, असा दावा त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी पेट्रोल, डिझेलवरील करांची आकडेवारी दिली आहे. डिझेलवर केंद्राचा कर प्रतिलिर 24.38 रुपये तर राज्याचा कर 22.37 रुपये आहे. याचवेळी पेट्रोलवर केंद्राचा कर प्रतिलिटर 31.58 रुपये आणि राज्याचा कर 32.55 रुपये आहे.

मोदींनी काल (ता.27) सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यांनी वाढत्या पेट्रोल दरांचा मुद्दा उपस्थित केला. मोदींनी काही राज्यांतील पेट्रोल दरांचे उदाहरण दिले. यात महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांतील पेट्रोल दरांची तुलना त्यांनी भाजपशासित राज्यांतील दरांशी केली. ते म्हणाले होते की, जागतिक पातळीवर युद्धसदृश स्थिती आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे सर्वांनीच संघराज्य रचना लक्षात घेऊन सहकार्य करायला हवे. राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करावी.

सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर 6 एप्रिलनंतर ही दरवाढ थांबली आहे. मागील 22 दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT