chief minister yogi adityanath announces lockdown in uttar pradesh
chief minister yogi adityanath announces lockdown in uttar pradesh  
देश

योगी आदित्यनाथ यांनी धुडकावली मोदींची सूचना; उत्तर प्रदेशात अखेर लॉकडाउन

वृत्तसंस्था

लखनौ : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. याचबरोबर उत्तर प्रदेशातील रुग्णसंख्या वाढू लागल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लॉकडाउन लावला आहे. लॉकडाउनला विरोध करणाऱ्या योगींनी अखेर तोच मार्ग स्वीकारला आहे. याआधी  कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा,  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाउन लागू केला होता. आता योगींनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली लॉकडाउन न लावण्याची सूचना धुडकावली आहे. 

उत्तर प्रदेशात आधी वीकएंड संचारबंदी लागू करण्यात आली होती. उद्या (ता.30) रात्रीपासून मंगळवारी (ता.4) सकाळपर्यंत याची मुदत वाढवली आहे. म्हणजेच राज्यात तीन दिवसांचा लॉकडाउन असणार आहे. योगी सरकार राज्यातील निर्बंध हळूहळू वाढवत अखेर लॉकडाउनपर्यंत पोचले आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करणार आहेत. 

कोरोनाचा सर्वाधिक कहर सुरु असलेल्या देशांतील दहा राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशात मागील 24 तासांत कोरोनाचे 29 हजार 824 रुग्ण सापडले असून, 266 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 11 लाख 82 हजार 848 वर गेली आहे. याचवेळी राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 11 हजार 943 झाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असावा, अशा सूचना सर्व राज्यांना काही दिवसांपूर्वी केल्या होत्या. तरीही मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. कर्नाटकातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी 14 दिवसांचा लॉकडाउन लावला आहे. राज्यात संचारबंदी असून, केवळ अत्यावश्यक सेवांना सकाळी 6 ते 10 या वेळेत परवानगी आहे. सकाळी 10 नंतर सगळी दुकाने बंद आहेत. केवळ बांधकाम, उत्पादन आणि कृषी क्षेत्राला यातून सवलत देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद आहे. 

गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाउनची घोषणा केली. गोव्यात आज (ता.29) सायंकाळी 7 पासून 3 मे रोजी सकाळपर्यंत लॉकडाउन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा आणि उद्योगांना फक्त परवानगी असेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असेल. कॅसिनो, हॉटेल, पब बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवांसाठी गोव्याच्या सीमा खुल्या राहणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी नुकताच संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी लॉकडाउनला विरोध करीत तो शेवटचा पर्याय असायला हवा, अशा सूचना केल्या होत्या. आता भाजपशासित कर्नाटकात कडक लॉकडाउन लावला आहे. आधी येडियुरप्पांनी पंतप्रधान मोदींचा सल्ला डावलला होता. त्यानंतर प्रमोद सावंत आणि आता योगी आदित्यनाथ यांनी मोदींच्या सल्ल्याच्या बरोबर उलट भूमिका घेतली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT