Xi Jinping
Xi Jinping  Sarkarnama
देश

जिनपिंग यांना गंभीर आजार! अत्याधुनिक उपचारांऐवजी पारंपरिक चिनी औषधांचा वापर

सरकारनामा ब्युरो

बीजिंग : चीनचे (China) अध्यक्ष शि जिनपिंग (Xi Jinping) हे आजारी असल्याची चर्चा सुरू होती. अखेर ही चर्चा खरी असल्याचे समोर आलं आहे. जिनपिंग मागील काही दिवसांपासून ‘सेरेब्रल एन्युरिझम’ (Cerebral Aneurysm) या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. मागील वर्षाच्या अखेरीस त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. या आजारावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी पारंपरिक चिनी उपचाराला त्यांनी पसंती दिली आहे.

जिनपिंग यांना झालेला ‘सेरेब्रल एन्युरिझम’ हा आजार मेंदूशी निगडित आहे. यामध्ये मेंदूतील रक्तवाहिनीत वाढ होते. यावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी जिनपिंग हे पारंपरिक चिनी उपचार घेत आहेत. या औषधांमुळे मेंदूतील रक्तवाहिन्या नरम होतात. शि जिनपिंग यांच्या आरोग्याबद्दल उलटसुलट चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. या आजारामुळेच अनेक दिवस सार्वजनिक जीवनात ते दिसले नव्हते, हे स्पष्ट झालं आहे.

बीजिंग हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान जिनपिंग यांनी कोणत्याही विदेशी नेत्यांची भेट घेतली नव्हती. त्याआधी २०१९मध्ये इटलीच्या दौऱ्यात जिनपिंग यांना चालताना त्रास होत होता. ते थोडेसे लंगडत चालत असल्याचेही दिसले होते. यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या होत्या. त्यानंतर फ्रान्सच्या भेटीतही त्यांना बसण्यासाठी आधार घ्यावा लागला होता. २०२०मध्ये चीनमधील शेन्झेनमध्ये आयोजित सार्वजनिक सभेतही जिनपिंग उशिराने पोहचले होते. सभेतील त्यांचे बोलणेही हळू आवाजातील होते आणि अनेक वेळा त्यांना खोकल्याची उबळ आली होती.

कोरोनाच्या साथीमुळे चीनची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. यामुळे चीनमध्ये तेल आणि गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. याचबरोबर झिरो कोविड धोरणामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची फटका अर्थव्यवस्थेला बसत आहे. यातच जिनपिंग यांच्या आजारपणाचे वृत्त आले आहे. तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून येण्याची तयारी शी जिनपिंग करीत आहेत. वर्षअखेरीस नव्या अध्यक्षांची निवड होणार असून, जिनपिंग यांच्या प्रकृतीमुळे त्यांच्या उमेदवारीबाबत आतापासूनच शंका उपस्थित केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT