Delhi pollution Latest News
Delhi pollution Latest News Sarkarnama
देश

दिल्लीकरांचा श्वास कोंडला; शाळा बंद, कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'..आता पावसाचाच आधार !

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह 'एनसीआर'मधील हवेची गुणवत्ता आज (ता.५ नोव्हेंबर) सलग तिसऱ्या दिवशीही गंभीर असून एनसीआरच्या सर्वच शहरांतील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) अतीशय खराब म्हणजे ४०० च्या पुढे नेंदवण्यात आला आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांत दिल्लीत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून पाऊस पडला की हवेतील ‘स्मॉग' किंचित कमी होते हा दरवर्षीचा अनुभव यंदाही येण्याची दिल्लीकर वाट पहात आहेत. (Delhi pollution Latest News)

दिवाळीत दिल्लीकरांनी वारेमाप फटाके फोटून केलेला कोट्यवधी रूपयांचा धूर व शेतातील तणे उघड्यावर जाळल्यामुळे शेजारच्या राज्यांतून येणारा धूर यामुळे हवेतील कुंदपणा कायम राहिला व दिल्लीकराचा श्वास कोंडलेला राहिला. त्यामुळे दिल्लीच्या आकाशात धुराचा जाड थर पसरल्याने एक्यूआय शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी 'गंभीर' श्रेणीत नोंदवण्यात आला.

दिल्लीचा एकूण एक्यूआय आज सकाळच्या मापनानुसार ४३१ होता. हे प्रमाण पर्यावरणाच्या दृष्टीने 'अतीगंभीर' मानले जाते आणि अशी हवा निरोगी लोकांवरही दुष्पपरिणाम करू शकतो. ही हवा आधीपासून श्वसनाचे व इतर विकार असलेल्यांची परिस्थिती गंभीर करू शकते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तील प्रदूषणाची वाढती पातळी लक्षात घेऊन शनिवारपासून प्राथमिक शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. दिल्ली सरकारच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना सोमवारपासून 'वर्क फ्रॉम होम' ची परवानगी देण्यात आलेली असून खासगी कार्यालयांनाही तसे आवाहन करण्यात आले आहे.

प्रदूषण पसरविणाऱयांवर कारवाईसाठी प्रत्येकी ६ जणांची पथके दिल्लीच्या साऱ्या भागांत तैनात करण्यात आली आहेत. डीटीसी बसच्या जोडीला राज्य सरकार 'परिवर्तन बस सेवा' देखील सुरू करणार असून यासाठी ५०० खासगी सीएनजी बसचा ताफा रस्त्यावर उतरणार आहे.

दिल्लीच्या हवेतील विषारी वायूकणांचे म्हणजे पार्टीकल माईल्सच्या (पीएम) प्रदूषणाचे प्रमाण गुरुवारी २.५ वरून आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे ३८ टक्क्यांवर पोहोचले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार १.५ पीएम हे जगण्यासाठी सुरक्षित प्रमाण मानले जाते. दिल्लीच्या हवेतील ‘पीएम'चे सर्वसाधारण प्रमाण याच्याही वर असते. प्रदूषण वाढण्याच्या काळात तर ते आटोक्याबाहेर जाते. त्यामुळे दिल्लीत सूर्यदर्शन होणेही दुरापास्त होते.

दिल्ली- एनसीआरमधील एक्यूआय -

दिल्ली- ४३१ च्या वर

नोएडा - ५२९

गुरुग्राम ४७८

धीरपूरजवळ ५३४

स्मॉग टॉवर बंद पडले

दिल्लीच्य हवेतील विषारी धूर शोषून घेण्यासाठी कॅनॉट प्लेस भागात स्मॉग टॉवर उभारण्यात आले. पाठोपाठ नोएडा व गुरूग्राममध्येही कोट्यवधी रूपये खर्चून असे टॉवर उभारले गेले. आज परिस्थिती अशी आहे की दिल्लीतील स्मॉग टॉवर आचके देत असून नोएडा, गुरूग्राममधील टॉवर्सचे कामच थांबले आहे. त्यांच्या देखभाल-दुरूस्तीकडे उर्वरीत वर्षभरात संबंधित सरकारांनी काहीही उपाययोजना न केल्याने हे स्मॉग टॉवर आज वायूप्रदूषण कमी करण्यात निरूपयोगी ठरत आहेत.

दरम्यान, दिल्ली एनसीआरमधी वायू प्रदूषणाची समस्या दर वर्षी उद्भवणारी आहे. पण आमचे सरकार वर्षभऱ त्याबाबत काहीही हालचाली करत नसल्याने दिवाळीनंतर प्रत्येक वर्षी दिल्लीकरांचे प्राण कंठाशी येतात. प्रदूषणाच्या समस्येवर साऱ्याच संबंधितांनी राजकीय आरोप प्रत्यारोप टाळून गंभीर पावले उचलण्याची गरज आहे, असे मत विश्लेषक सईद अंसारी यांनी व्यक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT