Firing incident in Nagaland
Firing incident in Nagaland Sarkarnama
देश

मोठी बातमी : नागरिक अन् जवानांमध्ये तुफान धुमश्चक्री, गोळीबारात 13 जणांचा मृत्यू

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये (Tripura) काही दिवसांपूर्वीच झालेल्या हिंसाचारानंतर आता नागालँड (Nagaland) या राज्यात लष्करी जवान आणि नागरिकांमध्ये तुफान धुमश्चक्री झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये एका जवानासह तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागालँडमधील मोन जिल्ह्यातील तिरू गावाजवळ ही घटना घडली आहे.

सुरक्षा दल आणि नागरिक शनिवारी रात्री एकमेकांना भिडल्याचे समजते. उपलब्ध माहितीनुसार, ओटिंग गावातील नागरिक एका छोट्या ट्रकमधून रात्री घरी निघाले होते. याचवेळी सुरक्षा दलाने त्यांच्यावर गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक सुत्रांच्या म्हणण्यानुसार, अनेक तास नातेवाईक घरी आले नाहीत, म्हणून त्यांना शोधण्यासाठी गावातील काही जण बाहेर पडले होते. त्यांना एका ट्रकमध्ये मृतदेह आढळून आले.

ही घटनेची माहिती समजल्यानंतर गावातील चिडलेल्या नागरिकांनी सुरक्षा दलाची वाहनं पेटवून दिली. यामध्ये एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. आसाम रायफल्सने (Assam Rifles) सांगितले की, या भागातमध्ये एक लष्करी ऑपरेशन सुरू होती. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे जवान या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेचे नेमके कारण शोधले जाईल. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रियो यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली. ते म्हणाले, नागरिकांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. मृत्यू झालेल्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. विशेष चौकशी पथकाकडून कायद्यानुसार सखोल चौकशी केली जाईल. नागरिकांनी शांतता राखावी, अंस आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेविषयी दु:ख व्यक्त केलं आहे. ही घटना खूपच दु:खद आहे. राज्य सरकारद्वारे स्थापन कऱण्यात आलेली समिती घटनेची सखोल चौकशी करेल. मृत्यू झालेले नागरिक व कुटुंबीयांना यातून निश्चित न्याय मिळेल, असे ट्विट शहा यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT