CJP Delhi Protest March : नवी दिल्लीत जंतर-मंतर ते संसद भवन असा कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा काढण्यात आला. यासाठी लाखभर तरुण आज दिल्लीत दाखल झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर दिल्ली पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी या तरुणांना पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज केला, अत्यंत अमानुषपणे विद्यार्थ्यांना मारहाण करण्याती आली. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यांपैकीच एका व्हिडिओ नागपूरच्या एका तरुणाला पोलिसांनी चहू बाजूंनी घेरून मारलं. यावेळी तो पोलिसांसमोर ठामपणे उभा राहत 'मारो सर, मार डालो' असं म्हणत राहिला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, कोण आहे हा तरुण जाणून घेऊयात.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या तरुणाचा व्हिडिओ फेसबूकवर शेअर केला आहे. जंतर-मंतर जवळ तरुणांच्या झालेल्या गर्दीचा हा व्हिडिओ असून यावेळी एक तरुण या पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी त्याला चहू बाजुंनी घेरलं आणि त्याच्या शरिरावर चारही बाजुंनी लाठ्या बरसवायला सुरुवात केली. सुरुवातीला तो थोडासा घाबरलेला या व्हिडिओत दिसतो. पण नंतर तो एकाच जागी ठामपणे उभा राहिला आणि त्या पोलिसांना म्हणाला 'मारो सर, मार डालो', यानंतर त्यानं एकाच जागी उभा राहत आपल्यातला सर्व संताप या पोलिसांसमोर व्यक्त केला. पोलिसांनी त्याचा हा अवतार बघताच पोलिसांनाही क्षणभर आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला असावा. याचवेळी त्या तरुणाला सावरण्यासाठी एक महिला पोलीस जिच्या हातात राष्ट्रध्वज होता ती पुढे आली आणि तिनं त्याला हातानेच मागे सारत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इतरही पोलीस आले आणि त्याला बाजुला घेतलं. पण हा व्हिडिओ अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आहे.
इंडियन एक्स्प्रेसनं या तरुणाचा व्हिडिओ पोस्ट केला असून यात तो आपलं नाव भरत बनाईत असं सांगतो, तसंच आपण नागपूरचा रहिवासी असल्यांचही त्यानं इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं आहे. "माझ्या डोक्यावर आणि शरीराच्या प्रत्येक भागावर प्रहार करण्यात आले. सुमारे १५-२० आरएएफ (रॅपिड ॲक्शन फोर्स) अधिकारी मला मारहाण करत होते. हे विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे आणि त्याविरुद्ध सरकारने केलेल्या कारवाईचा मी निषेध करतो" अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यानं दिली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज दिल्लीत लाखो तरुण दाखल झाले होते. त्यांच्या मनात व्यवस्थेविरोधातील आणि सरकारविरोधातील राग दिसत होता. देशात गेल्या काही दिवसांत NEET, TET सारख्या पेपर फुटीची प्रकरणं समोर आली आहेत. यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तरुणांचा रोजगाराचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. उच्चशिक्षण घेऊन डिग्र्या घेऊनही काम मिळत नाही. त्यामुळं लग्न होत नाहीत, तसंच दिवसेंदिवस महागाई उच्चांकच गाठत आहे, या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच पार्टीच्या या आंदोलनाला आजच्या २२ दिवशी अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.