CJP Protest: दिल्लीत सीजेपीनं पुकारलेल्या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही जंतर-मंतर मैदानाकडं येणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी सकाळपासूनच ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आता देशभरात लोक एकवटायला लागले आहेत. मुंबईसह पुण्यातही काही संघटनांनी सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं.
मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात सध्या आंदोलक मोठ्या प्रमाणावर गोळा झाले आहेत. डाव्या पक्षांनी या आंदोलनात पुढाकार घेतला असून सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला आहे. सीजेपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलकही आक्रमक झाले आहेत. त्यामुळं पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरपोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसरीकडं पुण्यात लाल महालाजवळही काही संघटनांनी दिल्लीत अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरु केलं आहे. या ठिकाणीही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या पुढाकारानं मतदार यादीतील नागरिकांची नावे वगळण्यात आली, त्याचा भाजपला फायदा झाला, असा आरोप करत ज्ञानेश कुमार यांना अटक करा आणि एसआयआर रद्द करा, या मागणीसाठी पुण्यात लोकशाही अधिकार संघर्ष समितीच्या पुढाकाराने लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालय इथं विशाल विमल यांच्यासह बी. युवराज, साधना शिंदे, दत्ता केंजळे, विशाल गोखले यांच्यासह पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना लष्कर पोलिस स्टेशन इथं नेण्यात आलं.
त्याचबरोबर सकाळी दिपकेंसह त्यांच्या सहकाऱ्यांना विमानातच ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त समोर आल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे काही वकील त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन मोर्चा काढला. यावेळी त्यांच्या हातात पोस्टर्स होते. यावेळी या वकिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि जवळच्या पोलीस ठाण्यात आणून ठेवलं. पण आता ताज्या अपडेटनुसार, या वकिलांना सोडून देण्याचा आदेश पोलीस प्रशासनानं काढले आहेत.
सीजेपीचं आजचं आंदोलन होऊ शकलं नाही, कारण पोलिसांनी जंतर-मंतरवर कोणाला पोहोचूच दिलं नाही. पण तरीही या आंदोलनाची आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीची अधिकाधिक चर्चा होताना दिसत आहे. एकूणच सीजेपीच्या आंदोलन आता अधिकाधिक व्यापक होताना दिसतं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.