अमृतसर : पंजाब विधानसभेत काँग्रेसला धूळ चारत आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) ९२ जागा जिंकत एकहाती आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhawant mann) पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत. मान यांची आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. त्यानंतर शनिवारी त्यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेवून सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी हा दावा स्विकारला असून १६ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता खटकर कलान या भगतसिंग यांच्या मूळ गावी त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
या सोहळ्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने जोरदार तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी मान यांनी खास शैलीत पंजाबवासियांना निमंत्रण दिले आहे. काल एक व्हिडिओ ट्विट करुन मान म्हणाले, "तुमच्या भावाला प्रोत्साहन देण्यासाठी १६ तारखेला कृपया सकाळी १० वाजता खटकर कलान येथे या, येताना महिलांनी भगवे दुपट्टे आणि पुरुषांनी भगवी पगडी घालून याव, कारण शीख धर्मात केशरी रंगाला महत्त्व आहे. आपण त्या दिवशी खटकर कलान गावाला भगव्या रंगाने रंगवून टाकू, मी आपली आतुरतेने वाट बघत आहे.
याशिवाय या सोहळ्यावर सुमारे दोन कोटी ६१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यासाठी मान्यताही देण्यात आली आहे. मान यांच्या शपथविधी सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ११७ आमदार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मान यांचे कुटुंबिय, जवळचे मित्र आणि आम आदमीचे पदाधिकारी केवळ अशानांच निमंत्रण दिले आहे. इतर कोणत्याही बड्या नेत्याला किंवा इतर राज्यांचे मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.
या कार्यक्रमासाठी ६ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असणार आहे. तसेच शपथविधी दरम्यान विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी विशेष चौक्या लावण्यात आल्या आहेत. यासोबतच सीआयडी आणि इतर गुप्तचर यंत्रणांची देखील या संपूर्ण सोहळ्यावर नजर असणार आहे.
मान यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील सर्व कोरोना निर्बंध तात्काळ प्रभावातून हटवण्यात आले आहेत. यापूर्वी पंजाबमध्ये खुल्या जागेत ५० टक्क्यांच्या उपस्थितीची मर्यादा लावण्यात आली होती. यासोबतच मल्टिप्लेक्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स, जीम अशा ठिकाणी ७५ टक्क्यांच्या उपस्थितीची मर्यादा लावण्यात आली होती. मात्र आता उपस्थितीवरील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. याआधी निर्बंधांना २५ मार्च पर्यंत वाढवण्यात आले होते. मात्र आता शपथविधीच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्बंध तात्काळ प्रभावात मागे घेण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.