नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे स्वस्त इंधन पर्याय म्हणून वाहनचालकांकडून सीएनजीला (CNG) पसंती दिली जात होती. मात्र, आता सीएनजीवर गाडी चालवणेही महाग झाले आहे. सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. खनिज तेलाच्या भावाचा भडका आणि केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केल्याने सीएनजी सातत्याने महागताना दिसत आहे.
रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 130 डॉलरवर पोचला आहे. खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाल्याने सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सीएनजीचा दर एक रुपयाने वाढवण्यात आला आहे. दिल्लीत सीएनजीचा दर प्रतिकिलो 57.51 रुपयांवर गेला आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीचा दर 59.58 रुपयांवर पोचला आहे.
केंद्र सरकारने मागील वर्षी नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केली. यामुळे सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका टॅक्सी, बस आणि रिक्षांसोबत खासगी कारचालकांना होत आहे. स्वस्त इंधनाचा पर्याय म्हणून सीएनजीकडे वळणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा भुर्दंड यामुळे बसू लागला आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे टॅक्सी आणि रिक्षा संघटना आता भाडेवाढ करण्याची मागणी करू लागल्या आहेत.
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ सुरू आहे. मागील वर्षी एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ झाली. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवर पोचली आहे. दरम्यान, मोदी सरकारने 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली होती. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनाही दरवाढ थांबवली होती. आता देशांतील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्या असून, पुन्हा दरवाढ सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.