Rahul Gandhi Sakarnama
देश

Gautam Adani Coal Scam : कोळसा घोटाळा 20 नव्हे, 32 हजार कोटींचा; राहुल गांधींचे गौतम अदानींवर गंभीर आरोप

Rahul Gandhi Allegation's : एवढे पुरावे असूनही केंद्र सरकार अदानींवर कारवाई का करत नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

अनुराधा धावडे

New Delhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर 20 हजार कोटींच्या कोळसा घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी घोटाळा 20 हजार कोटींचा नसून, 32 हजार कोटींचा असल्याचा आरोप केला. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. फायनान्शियल टाईम्स वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या वृत्ताचा हवाला त्यांनी दिला. तसेच, इतके सगळे पुरावे असूनही अदानींवर कारवाई का केली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, गौतम अदानी इंडोनेशियामध्ये कोळसा (Coal Scam) विकत घेतात आणि भारतात त्याचा दर दुप्पट दाखवला जातो. ते कोळशाच्या किमती चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातील प्रत्येक गरीब व्यक्तीच्या घरात विजेचे बटण दाबताच त्यातून निर्माण होणारा पैसा अदानीच्या खिशात जातो.

पंतप्रधान अदानींना संरक्षण देत आहेत. जगातल्या इतर देशांमध्ये पण याचा तपास सुरू आहे, पण भारतात मात्र अदानी यांना क्लीन चिट देण्यात आली. ते वाट्टेल ते करू शकतात, पण लोकांनी 32 हजार कोटींचा आकडा लक्षात ठेवावा. पंतप्रधान अदानींची चौकशी का करत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कोळशाच्या चुकीच्या किमती दाखवून अदानींनी आधीच विजेचे दर वाढवून जनतेकडून 12 हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. विजेच्या वाढत्या किमतीमागे अदानींचा हात आहे. यावर माध्यमे प्रश्न उपस्थित करत नाहीत. आम्ही कर्नाटक आणि राजस्थानमधील लोकांना सबसिडी देत ​​आहोत, पण अदानी विजेच्या किंमत वाढवत आहेत. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का, असाही प्रश्न त्यांनी विचारला.

या वेळी त्यांना शरद पवार आणि अदानी यांच्यातील जवळीकीबाबत विचारले असता, राहुल गांधी म्हणाले, "शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत, ते अदानींना संरक्षण देत नाहीत. म्हणूनच मी शरद पवारांना अदानीबद्दल प्रश्न विचारत नाही. जर शरद पवार पंतप्रधान असते तर मी त्यांनाही प्रश्न विचारले असते.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT