New Delhi News: राजधानी दिल्लीच नव्हे,तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर मोठं यश आलं आहे. मोदी सरकारनं सीजेपीच्या तीनही मागण्या केल्या आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उर्वरित दोन्हीही मागण्या सरकारकडून मान्य झाल्यानंतर अखेर कॉक्रोच जनता पार्टीनं आपलं आंदोलन मागे घेतलं आहे.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सीजेपी आणि मोदी सरकारमधील तिसरी बैठक शनिवारी(ता.25) पार पडली. या बैठकीत सरकारने सीजेपीच्या आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची आणि कथित पेपरफुटीमुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत सरकारकडून केली जाणार असल्याच्या दोन मागण्याही मान्य केल्या. यानंतर सीजेपीकडून दिल्लीतील आंदोलन मागे घेतल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
कॉक्रोच जनता पार्टीनं सव्वा दोन महिन्यांतच केंद्रातील मोदी सरकारला पहिला मोठा दणका दिला आहे. तब्बल 12 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एखाद्या मंत्र्याला आंदोलनामुळे राजीनामा देण्याची ही पहिलीच वेळ ठरली. धर्मेंद्र प्रधानांवर ही मोठी नामुष्की ओढावली आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीनं अर्धी लढाई जिंकली होती. यानंतर दिल्लीसह संपूर्ण देशभरात विद्यार्थ्यांसह विरोधकांचा जल्लोष पाहायला मिळाला होता. यानंतर सरकारमधील मंत्री जे पी नड्डा, मंत्री जितेंद्र सिंह आणि सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास,आशुतोष रांका यांच्यात तिसरी सविस्तर बैठक झाली. या बैठकी अगोदरच प्रधानांचा राजीनामा आल्यामुळे उर्वरित दोन मागण्यांवरच चर्चा झाली.
आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, गेल्या 37 दिवसांपासून जंतर मंतरवर आमचं आंदोलन सुरु होतं.या आंदोलनाच्या पाठीमागं आमच्या तीन प्रमुख मागण्या होत्या. त्यात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घेणं, आणि भविष्यात या आंदोलकांविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात येऊ नये, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला आहे,त्यांच्या कुटुंबियांना एक कोटींची आर्थिक मदत सरकारकडून देण्यात यावी या मागण्यांचा समावेश होता.
यात धर्मेंद्र प्रधानांनी ऑलरेडी राजीनामा दिला आहे. त्यात विद्यार्थ्यांवर दाखल गुन्हे मागे घेणे आणि त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच या सरकारने आंदोलनादरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलत जीव गमावला,त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचंही आश्वासन दिलं असल्याचंही रांका यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी सीजेपीसोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारने कॉक्रोच जनता पार्टीच्या तीनही प्रमुख मागण्या केल्याचं जाहीर केलं. तसेच आंदोलनातील सहभागी विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याची ग्वाहीही सीजेपीच्या प्रवक्त्यांना दिली. यानंतर सीजेपीकडून हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.