Dr.Manmohan Singh
Dr.Manmohan Singh  File Photo
देश

माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांच्या प्रकृतीबाबत 'एम्स'चा अखेर खुलासा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांना भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले आहे. डॉ. सिंग यांना ताप आला होता आणि अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना तातडीने एम्समध्ये हलवण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरल्याने अखेर काँग्रेससह एम्सने याबद्दल खुलासा केला आहे.

काँग्रेस प्रवक्ते प्रणव झा यांनी आज सकाळीच ट्विट करून डॉ. सिंग यांची प्रकृती कालपेक्षा चांगली असल्याचे ट्विट केले होते. झा यांनी म्हटले आहे की, तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी की डॉ.मनमोहनसिंग यांची प्रकृती चांगली आहे. कालपेक्षा ती उत्तम आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करूयात. त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या अफवा योग्य नाहीत. माजी पंतप्रधानांचा खासगीपणा जपावा, अशी सर्वांनाच आदरपूर्वक विनंती.

डॉ.सिंग यांना ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना 13 ऑक्टोबरला तातडीने एम्समध्ये हलवण्यात आले होते. रुग्णालयातील कार्डिओ-न्युरो सेंटरमधील वॉर्डमध्ये डॉ.सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत. हृदयरोगतज्ञ डॉ.नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, ती सुधारत आहे, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने एम्सच्या हवाल्याने दिली आहे.

डॉ.सिंग यांना एम्समध्ये दाखल केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी काल (ता.14) रुग्णालयाला भेट दिली होती. त्यांनी डॉ.सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत त्यांच्यावरील उपचारांचीही माहिती घेतली होती. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही एम्समध्ये जाऊन डॉ.सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

डॉ. सिंग यांना याच वर्षी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत ते कोरोनाबाधित झाले होते. त्यांना 19 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते कोरोनाशी यशस्वी झुंज देऊन 29 एप्रिलला रुग्णालयातून बाहेर पडले होते. मागील वर्षी मे महिन्यात डॉ. सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर कार्डिओ थोरॅसिक विभागात उपचार सुरू होते. डॉ. सिंग यांच्यावर 2009 मध्ये ‘एम्स’मध्येच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉ.मनमोहनसिंग हे 89 वर्षांचे आहेत. ते राज्यसभा सदस्य आहेत. ते राजस्थानमधून राज्यसभेवर गेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT