Congress  Sarkaranama
देश

काँग्रेसनं केलं चकित; माजी मुख्यमंत्र्यांसह आठ उमेदवारांची यादी जाहीर करत टाकला डाव

यादीमध्ये दिगंबर कामत, संकल्प अमोणकर या नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीत काँग्रेसने (Congress) आघाडी घेतल्याचे दिसत आहे. सर्वच पक्षांना चकित करत काँग्रेसने गुरूवारी आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यांचाही समावेश आहे. काँग्रेसने पक्षातील फुट टाळण्यासाठीच ही यादी जाहीर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

गोव्यामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. काँग्रेसकडून जाहीर केलेल्या यादीनुसार, कामत हे मडगाव मतदारसंघातील लढतील. कामत हे गोवा काँग्रेसचे अध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेतेही आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेल्या संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) यांचाही या यादीत समावेश असून त्यांना मुरगाव मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेले सुधीर कानोलकर यांना म्हापसा मतदारसंघातून तिकीट मिळालं आहे. कानोलकर हे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते. ताळेगाव मतदारसंघातून टोनी रॉड्रिगेज हे लढतील. तर फोंडामधून पक्षाने राजेश वेर्णेकर यांना तिकीट दिलं आहे. कुर्टोरी मतदारसंघात एलिक्सो रेगिनाल्डो लोरेंको, कुंकळ्ळी मतदारसंघात युरी आलेमाव आणि केपे मतदारसंघातून अँटोनी डीकोस्टा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, या धामधुमीत भाजपला चोवीस तासात दोन मोठे धक्के बसले आहेत. कॅबिनेट मंत्र्याने बुधवारी रात्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता एका आमदारानेही पक्षाला रामराम ठोकला आहे. गोव्याचे (Goa) नगर विकास मंत्री आणि भाजपचे (BJP) आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी बुधवारी रात्री उशिरा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सेक्स स्कँडलमध्ये (Sex Scandle) सहभागी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने (Congress) केला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी अलीना सलडान्हा (Alina Saldanha) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता.

अखेर अलीना यांनी आम आदमी पक्षाला पसंती दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्या उपस्थितीत त्यांनी आमदारकीच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच आपमध्ये प्रवेश केला आहे. केजरीवाल यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून बाहेर पडलेल्या त्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत. तसेच त्यांच्या प्रवेशाने आपची ताकदही वाढली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने बुधवारी रात्री उशिरा एक निवेदन प्रसिध्द करत नाईक यांच्या राजीनाम्याबाबत स्पष्ट केलं आहे. नाईक यांनी मुक्त आणि कोणत्याही दबावाशिवाय चौकशी व्हावी, यासाठी राजीनामा दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. कार्यालयाने याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नाईक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून तो स्वीकारण्यात आला आहे. त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT