रायपूर : राज्यसभा निवडणुकीमुळं (Rajya Sabha Election) देशातलं वातावरण तापलं आहे. अनेक राज्यात या निवडणुकीमुळं राजकीय तिढा निर्माण झाला आहे. असे असताना छत्तीसगडमधून काँग्रेसचे (Congress) दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. यात राजीव शुक्ला (Rajeev Shukla) आणि रंजिता रंजन (Ranjeet Ranjan) यांचा समावेश आहे. भाजपकडे (BJP) पुरेसं संख्याबळ नसल्याने पक्षानं राज्यसभा उमेदवारच दिला नव्हता. त्यामुळं काँग्रेसच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला. (Rajya Sabha Election News)
राज्यसभा उमेदवारीचा अर्ज माघार घेण्याची मुदत आज दुपारी 3 वाजता संपली. यामुळे या दोघांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले, अशी माहिती विधानसभेचे सचिव दिनेश शर्मा यांनी दिली. रंजन यांनी स्वत: शर्मा यांच्याकडून विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले तर शुक्लांच्या वतीने त्यांच्या बंधूने हे प्रमाणपत्र स्वीकारले. छत्तीसगडमधील एकूण पाच राज्यसभा सदस्य आहेत. काँग्रेसच्या छाया वर्मा आणि भाजपचे रामविचार नेताम हे पुढील महिन्यात राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी आता शुक्ला आणि रंजन यांची निवड झाली आहे. राज्यातील इतर तीन राज्यसभा सदस्यांमध्ये काँग्रेसचे केटीएस तुलसी आणि फुलोदेवी नेताम तर भाजपच्या सरोज पांडे यांचा समावेश आहे.
राजीव शुक्ला हे 63 वर्षांचे असून, ते मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ते आधी तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. रंजन या मूळच्या बिहारमधील असून, त्या माजी लोकसभा सदस्य आहेत. छत्तीसगडमध्ये एकूण 90 आमदार असून, त्यात काँग्रेसचे 71, भाजपचे 14 तर जनता काँग्रेस छत्तीसगड आणि बहुजन समाज पक्षाचे अनुक्रमे 3 व 2 आमदार आहेत. भाजपचे संख्याबळ कमी असल्याने भाजपने राज्यसभा निवडणुकीत उमेदवारच दिला नव्हता. यामुळे काँग्रेसचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले.
बिहारमधून पाच जण बिनविरोध
दरम्यान, बिहारमधून पाच जण बिनविरोध राज्यसभेवर निवडून गेले आहेत. बिहार विधानसभेतील संख्याबळ पाहता राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि भाजपला प्रत्येकी दोन आणि जेडीयूला एक जागा मिळेल, असे चित्र होते. त्यानुसार आरजेडीने लालूप्रसाद यादवांची कन्या मिसा भारती आणि फैयाज अहमद हे दोन उमेदवार दिले होते. भाजपने शंभूशरण पटेल आणि सतीशचंद्र दुबे यांना उमेदवारी दिली होती. संयुक्त जनता दलाने (JDU) खिरू महातो यांना उभे केले होते. राज्यसभेच्या पाच जागांसाठी पाचच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. मिसा भारती आणि सतीशचंद्र दुबे हे दुसऱ्यांदा राज्यसभेत जात आहेत. तर, खिरू महातो, फैयाज अहमद आणि शंभूशरण पटेल हे पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.