PM Narendra Modi, Sonia Gandhi
PM Narendra Modi, Sonia Gandhi 
देश

मोदींना मिळालेल्या ऑफरचं काँग्रेसलाही कौतुक!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ग्लासगोमध्ये (Glasgow) नुकत्याच झालेल्या सीओपी 26 जलवायू शिखर परिषदेला संबोधित केले. यावेळी इस्त्रायलचे (Israel) पंतप्रधान नफ्ताली बेनेट (PM Naftali Bennett) यांच्यासोबतही त्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान बेनेट यांनी मोदींना थेट आपल्या पक्षात येण्याच आमंत्रण देऊन टाकले. त्यावर काँग्रेसला प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नाही.

पंतप्रधान मोदी व बेनेट यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये बेनेट मोदींना म्हणतात की, 'तुम्ही इस्त्रायलमध्ये खूप लोकप्रिय आहात.' त्यावर मोदी त्यांचे आभार मानतात. पण नंतर लगेचच बेनेट मोदींना आपल्या पक्षात येण्याची ऑफर देतात. हे ऐकताच मोदींना हसू आवरत नाही. मोदी आणि बेनेट यांच्यातील ही पहिलीच अशी भेट आहे.

पंतप्रधान बेनेट यांच्या या ऑफरचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसलाही त्यावर प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नाही. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत काँग्रेसने पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. 'पंतप्रधान बेनेट यांची कल्पना चांगली आहे. भारताला वाचवण्यासाठी हे पहिलं पाऊल असेल,' असं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, बेनेट यांनी जून महिन्यात पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यांनी निवडणुकीत बेंजामिन नेतान्याहू यांचा पराभव केला आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून म्हटले की, इस्त्रायलसोबतच्या मैत्रीला अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी व नफ्ताली बेनेट यांच्यात ग्लासगोमध्ये सकारात्मक बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी आपल्या नागरिकांच्या फायद्यासाठी एकमेकांना सहकार्य कऱण्यावर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी यांनी जुलै 2017 मध्ये इस्त्रायलचा दौरा केला होता. यावेळी भारत आणि इस्त्रायलमधील द्विपक्षीय संबंध अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने पावले टाकण्यात आली होती. आता बेनेट हेही पुढील वर्षी भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी मागील महिन्यात इस्त्रायल दौऱ्यावर असताना बेनेट यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर मोदी व बेनेट यांची नुकतीच बैठक झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT