Rahul Gandhi Pub Video Viral
Rahul Gandhi Pub Video Viral Sarkarnama
देश

लग्नाला जाणं अजून तरी गुन्हा नाही! भाजपचे नेते तुटून पडताच काँग्रेसचा पलटवार

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा नेपाळमधील एका नाईटक्लबमधील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांसह भाजपचे (BJP) अनेक नेते राहुल गांधींसह काँग्रेसवर तुटून पडले आहेत. त्यानंतर काँग्रेसनंही पलटवार करत लग्नाला जाणं अजून तरी गुन्हा नाही, अशी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पाकिस्तान भेटीवरूनही काँग्रेसने निशाणा साधला आहे. (Rahul Gandhi Pub Video Viral)

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, निमंत्रण नसताना पंतप्रधान मोदी हे नवाज शरीफ यांच्यासोबत केक कापण्यासाठी पाकिस्तानला गेले होते. त्याप्रमाणे राहुल गांधी गेलेले नाहीत. पठाणकोटमध्ये काय झालं, हे आपण पाहिलं आहे. राहुल गांधी हे मित्रराष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये एका पत्रकाराच्या विवाहात सहभागी होण्यासाठी गेले आहेत.

विवाह हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. हा गुन्हा नाही. पण पंतप्रधान आणि भाजपला लवकरच मित्रांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या विवाहात सहभागी होणे म्हणजे गुन्हा असा निर्णय घेतील, असा टोला सुरजेवाला यांनी लगावला. पंतप्रधान मोदी हे 2015 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले होते. हे उदाहरण देत सुरजेवाला यांनी राहुल गांधींची पाठराखण केली.

दरम्यान, राहुल गांधी हे सध्या नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या एका मैत्रिणीच्या विवाहासाठी ते तिथं गेले आहेत. यादरम्यानचा त्यांना एक व्हिडीओ सोशल मीडियात (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ते काठमांडू येथील एका नाईटक्लबमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल करत भाजपने (BJP) काँग्रेस व राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ नेपाळमधील लॉर्ड ऑफ दि ड्रिंक्स या पबमधील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये ते संगीत पार्टीचा आनंद घेताना दिसत आहे. तसेच महिलेशी बोलताना, मोबाईल पाहतानाही या व्हिडीओमध्ये ते दिसत आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत टीकास्त्र सोडलं आहे.

रिजिजू यांनी म्हटलं आहे की, 'सुट्टी, पार्टी, प्लेजर ट्रीप, खासगी परदेश भेट आदी आता देशासाठी आता नवे नाही.' भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख अमित मालविया यांनीही टीका केली आहे. 'जेव्हा मुंबईवर हल्ला झाला तेव्हाही राहुल गांधी नाईटक्लबमध्ये होते. आता पक्ष संकटात आहे, तरीही ते नाईकक्लबमध्येच आहेत. त्यांच्यामध्ये सातत्य आहे,' असा टोला मालविया यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT