Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
देश

राहुल गांधींनी वर्तवलेलं भाकित अखेर खरं ठरलं!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज कृषी कायद्यांवर यू-टर्न घेतला आहे. मागील वर्षभरापासून तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे मोदींनी हे कायदे मागे घेतल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे या निमित्ताने काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वर्तविलेले भाकित खरे ठरल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

राहुल गांधी हे 14 जानेवारीला पोंगल सणादिवशी मदुराईला गेले होते. त्यावेळी मदुराई विमानतळावर बोलताना त्यांनी हे भाकित केले होते. त्यांनी म्हटले होते की, शेतकरी जे काही करीत आहेत त्याबद्दल मला अतिशय अभिमान आहे. मी शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहे आणि त्यांच्यासोबत उभा आहे. मी कृषी कायद्यांचा मुद्दा पंजाबमध्येही यात्रेदरम्यान उपस्थित केला होता आणि पुढेही करीत राहीन. माझे शब्द लिहून ठेवा की या सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागतील.

राहुल गांधींचा हा जुना व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर त्यांनीच हा व्हिडीओ ट्विटरवर पुन्हा शेअर केला. त्यांनी म्हटले आहे की, देशातील अन्नदात्यांच्या सत्याग्रहाने अहंकारी मस्तकाला झुकवले आहे. अन्यायाच्या विरोधातील या विजयाबद्दल खूप अभिनंदन! जय हिंद, जय हिंद का किसान!

देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. या महाअभियानात देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले होते. याचा उद्देश देशातील शेतकऱ्यांना अधिक ताकद मिळावी, उत्पादनाची योग्य किंमत आणि विक्रीचे पर्याय मिळावेत, असे होते. यावर संसदेत चर्चा झाली, नंतर हे कायदे आणले. देशातील कानाकोपऱ्यातील कोट्यवधी शेतकरी, अनेक शेतकरी संघटनांचे याचे स्वागत केले. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो.

मी आज देशवासियांची क्षमा मागत सत्य आणि पवित्र मनाने सांगू इच्छितो की, बहुतेक आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. दिव्याच्या प्रकाशाएवढे सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज गुरूनाक देवजींचे पवित्र प्रकाशपर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष देण्याची नाही. मी पूर्ण देशाला सांगायला आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायद्यांना परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस ससंदेत तिन्ही कृषी कायद्यांना परत घेण्याची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण केले जाईल. आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपआपल्या घरी जावे, शेतात जावे, कुटुंबात जावे. या नवीन सुरूवात करूया. नव्याने पुढे जाऊ, असे आवाहनही मोदींनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT