congress leader d k shivakumar says not in hurry for cm post  
देश

शिवकुमार यांच्या गुगलीने सिद्धरामय्यांची कोंडी

कर्नाटकात सत्ताधारी भापजमधील अंतर्गत वाद दररोज चव्हाट्यावर येत आहेत. आता विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमधील मतभेदही समोर येऊ लागले आहेत.

वृत्तसंस्था

बंगळूर :  कर्नाटकात (Karnataka) सत्ताधारी भाजपमधील (BJP) अंतर्गत वाद दररोज चव्हाट्यावर येत आहेत. आता विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमधील (Congress) मतभेदही समोर येऊ लागले आहेत. राज्यात दोन वर्षांनंतर विधानसभा निवडणूक होणार असली तरी काँग्रेसमध्ये आताच मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरू झाली आहे. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार (D.K.Shivakumar) यांनी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांची कोंडी केली आहे. 

भाजपमध्ये मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या विरोधात अनेक नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. भाजपध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरू असताना विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्येही याची सुरवात झाली आहे. राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न काँग्रेसमध्ये उपस्थित झाला आहे. यावरून कॉंग्रेस आमदारांमध्ये वाद सुरू झाला असून, दोन गट पडले आहेत. 

या पार्श्वभूमीवर बोलताना डी.के.शिवकुमार यांनी वादाचा चेंडू आता सिद्धरामय्या यांच्या कोर्टात टोलावला आहे. ते म्हणाले की, मला मुख्यमंत्रिपदाची कोणतीही घाई नाही. काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणणे, हाच माझा एकमेव अजेंडा आहे. मी 2-3 आमदारांची विधाने ऐकली आहे. सिद्धरामय्या हे काँग्रेसचे विधिमंडळ नेते आहेत. त्या आमदारांबाबत सिद्धरामय्या निर्णय घेतील. त्यांनी निर्णय न घेतल्यास राज्यात काँग्रेस अद्याप जिवंत आहे. 

सध्या काँग्रेसमध्ये एकही खुर्ची रिकामी नाही. आमचे सर्व प्रयत्न हे भाजपचा पराभव करणे आणि काँग्रेसला सत्तेत पुन्हा आणण्यासाठी सुरू आहेत. दुसऱ्या मुद्द्यांकडे लक्ष वळवण्याऐवजी आपल्याला भाजपशी लढून तिचा पराभव करायचा आहे. जनता, पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते अशा सर्वांना भाजपचा पराभव व्हावा, असे वाटत आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले. 

सिध्दरामय्या  आणि शिवकुमार यांचे समर्थक आमदार आपापल्या नेत्यांसाठी आतापासूनच बॅटिंग करू लागले आहेत. सिद्धरामय्या हेच पुढचे मुख्यमंत्री आहेत, असे काही आमदारांनी जाहीर वक्तव्य केल्याने प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार अस्वस्थ झाले होते. याबाबत शिवकुमार यांनी दिल्लीत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर सुरजेवाला यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन पक्षाचे आमदार आणि नेत्यांना ताकीद दिली होती.

सुरजेवाला यांनी जमीर अहमद खान आणि राघवेंद्र इटनाळ यांना सिद्धरामय्या हे पुढचे मुख्यमंत्री असल्याचे जाहीर वक्तव्य केल्याबद्दल इशारा दिला होता. सुरजेवाला यांनी म्हटले होते की, कर्नाटकात काँग्रेस नेतृत्वावरून काही लोक जाहीर वक्तव्य करीत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. जेव्हा पक्षाला संधी मिळते, तेव्हा पक्षाची हाय कमांड व आमदार नेतृत्त्वाबाबत निर्णय घेतील. नेतृत्वाबाबत आतापासूनच कुणीही कोणत्याही प्रकारचे विधान करू नयेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT