नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman ) यांनी मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यावर विरोधकांकडून टीकेचा भडिमार सुरू आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या आरोपांवर पत्रकार परिषदेत उत्तर देताना सीतारमण चांगल्याच भडकल्या. पण यादरम्यान त्यांनी वापरलेल्या दोन शब्दांमुळे उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने रान उठवले आहे. त्यामुळे हे दोन शब्द भाजपला निवडणुकीत महागात पडणार का, अशा चर्चांना ऊत आला आहे. (Union Budget 2022)
बजेटमध्ये नोकरदार, मध्यवर्ग गरीब, युवक, शेतकरी आणि एमएसएमईसाठी काहीच नाही, असं ट्विट राहुल गांधी यांनी बजेट सादर झाल्यानंतर केलं आहे. त्यावर सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. त्याआधी त्यांनी यावर राज्यमंत्री पंकज चौधरी यांना उत्तर देण्यास सांगितले होते. यावर चौधरी म्हणाले, ‘राहुल गांधी यांना बजेट समजलेच नाही. बजेटमध्ये सर्व घटकांसाठी घोषणा करण्यात आल्या आहेत.’ चौधरी यांच्या या उत्तरानंतर बोलताना सीतारमण म्हणाल्या, ‘चौधरी यांनी टिपिकल यूपी टाईप (UP Type) उत्तर दिलं आहे. मला वाटते यूपीमधून पळून जाणाऱ्या खासदारांसाठी एवढं पुरेसं आहे.’यातील यूपी टाईप या दोन शब्दांवरून काँग्रेसने भाजपला घेरले आहे. (UP Election 2022)
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे. सीतारमण यांनी युपीतील लोकांचा अपमान केला आहे. उत्तर प्रदेशातील लोकांना यूपी टाईप असण्याचा गर्व आहे. आम्हाला युपीची भाषा, बोली, संस्कृती आणि इतिहासावर गर्व आहे. तुम्ही बजेटमध्ये यूपीच्या झोळीत काहीच टाकलं नाही. ठीक आहे. पण युपीच्या लोकांचा असा अपमान करण्याची काय गरज होती, असा सवाल प्रियांका यांनी केला आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसकडून आता #यूपी_मेरा_अभिमान या हॅशटॅगची सुरूवात करण्यात आली आहे. सीतारमण यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. (Priyanka Gandhi on Nirmala Sitharaman)
दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर टीका करताना सीतारमण म्हणाल्या होत्या की, राहुल गांधी यांनी बजेटसंदर्भात ट्विटरवर बोलण्याआधी बजेट समजून घ्यायला हवे. देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षातील नेत्याने कोणताही होमवर्क न करता टिप्पणी केली आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या प्रत्येकी घटकाबाबत मी घोषणा केल्या आहेत. केवळ ट्विटरवर काहीतरी टाकण्यासाठी बोलणं चुकीचे आहे. त्यांनी जी संकटात गेलेली अर्थव्यवस्था केली, ती मागील पाच वर्षांत मजबूत होत आहे.
बजेटवर बोलण्याआधी त्यांनी त्यांच्या राज्यांची चिंता करायला हवी, जिथे त्यांच्या पक्षाची सत्ता आहे. पंजाबमध्ये रोजगाराची काय स्थिती आहे. महाराष्ट्रात शेतकरी ठीक आहेत का? आजही महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहेत. राहुल गांधी या आत्महत्या थांबवत आहेत का? त्यामुळे कोणत्याही विषयांवर बोलण्याआधी त्यांनी महाराष्ट्र (Maharashtra) आणि पंजाबमध्ये करून दाखवावं आणि मग बोलावं, असा सल्ला सीतारमण यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.