Rahul Gandhi, Bharat Dojo Yatra 
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींची मोठी घोषणा; आता भारत जोडो नव्हे भारत ‘डोजो’ यात्रा..!

Rajanand More

New Delhi : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशात वातावरणनिर्मिती केली होती. या यात्रेत ते हजारो किलोमीटर चालले. त्यानंतर त्यांच्या फिटनेसची चर्चाही रंगली आहे. आता त्यांनी या फिटनेस मागचे कारण सांगत मोठी घोषणा केली आहे.

राहुल गांधींनी गुरूवारी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान शेकडो मुला-मुलींना मार्शल आर्टचे धडे गिरवल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे सांगतानाच त्यांनी लवकरच ‘भारत डोजो यात्रा’ सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे.    

काय म्हटलंय राहुल गांधींनी?

हजारो किलोमीटर चालत प्रवास असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी सायंकाळी जिउ-जित्सुचा अभ्यास करणे ही आमची दिनचर्या होती. फिट राहण्यासाठी सुरू झालेला हा अभ्यास एक सामुहिक चळवळ बनला. आम्ही थांबलेल्या शहरांमध्ये तेथील सोबतचे लोक आणि युवा मार्शल आर्टचे विद्यार्थ एकत्र आले, असे राहुल यांनी म्हटले आहे.

राहुल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते लहान मुलांसोबत मार्शल आर्टचे धडे देताना दिसत आहेत. आपले ध्येय हे युवा मनांना ‘जेंटल आर्ट’च्या सुंदरतेशी परिचय करून देण्याचे होते. ही कला ध्यान, जिउ-जित्सू, ऐकिडो आणि अहिंसक संघर्षातील समाधानाचे मिश्रण आहे.

हिंसेचे सौम्यतेमध्ये रूपांतर करण्याचे मूल्य त्यांच्यामध्ये रुजवणे, त्यांना अधिक दयाळू आणि सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी साधने देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘जेंटल आर्ट’चा सराव करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त मला आमचा अनुभव तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचा आहे, असे म्हणत राहुल गांधीनी लवकरच भारत डोजो यात्रा येणार असल्याचे सांगितले आहे.

डोजो, जिउ-जित्सू, ऐकिडो म्हणजे काय?

जिउ-जित्सू ही जपानमधील मार्शल आर्टचा एक प्रकार आहे. ही स्वसंरक्षणाची प्रभावी कला म्हणून ओळखली जाते. ऐकिडो हे मार्शल आर्टचे प्रकार आहेत. ऐकिडोही स्वसंरक्षणासाठी एक कला असून त्यामुळे फिट आणि मन शांत राहण्यास मदत होते. या कलांचे प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या केंद्रांना किंवा संस्थांना ‘डोजो’ म्हटले जाते.

राहुल गांधी ब्लॅक बेल्ट

एकिडो या मार्शल आर्ट प्रकारामध्ये राहुल गांधी यांनी ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. यामध्ये नऊ लेव्हल असतात. प्रत्येक लेव्हलमध्ये ब्लॅक बेल्ट असतो. त्यापैकी पहिल्या लेव्हलमध्ये राहुल हे मास्टर आहेत. त्यांनी यापूर्वी या कलेविषयी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT