Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
देश

भाजप मतं मागायला आल्यावर 'हे' लक्षात ठेवा!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भावी शिक्षकांना पोलिसांनी लाठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावरून राजकारण तापलं आहे. विरोधकांनी योगींसह भाजपवर शरसंधान साधलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. रोजगार मागायला आलेल्यांवर उत्तर प्रदेश सरकार लाठीमार करत आहे. आता भाजप मतं मागायला आल्यावर हे लक्षात ठेवा, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. युवकांनो, त्यांनी कितीही लाठीमार केला तरी रोजगाराच्या अधिकाराची लढाई सुरूच ठेवा. मी तुमच्या सोबत आहे, असं ट्विट प्रियांका यांनी केलं आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओ शनिवारी रात्रीचा असल्याचा दावा केला जात आहे. उत्तर प्रदेशात 2019 मध्ये सहायक शिक्षक पदाच्या तब्बल 69 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे समोर आले. आरक्षणाचा कोटा आणि गुणवत्ता यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला.

त्यानंतर निवड न झालेल्या उमेदवारांनी ही प्रक्रिया स्थगित करून चौकशी करण्याची मागणी सुरू केली. मागील दोन वर्षांपासून एससी आणि ओबीसीतील अनेक तरूण त्यासाठी सरकारशी लढा देत आहेत. शनिवारी तरूणांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मेणबत्ती मोर्चा काढला होता. पण पोलिसांनी मोर्चाला रस्त्त्यातच अडवून लाठीमार सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला असून उत्तर प्रदेशातील राजकारण तापलं आहे. समाजवादी पक्षाने हा व्हिडीओ ट्विट करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांवर टीका केली आहे. मागासवर्गीय व दलितांचे आरक्षण न देणारे मुख्यमंत्री शिक्षकांवर लाठी चालवत असल्याचे समाजवादी पक्षाने म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही टीका केली आहे.

भाजपच्या राज्यात भावी शिक्षकांवर लाठ्या चालवून विश्वगुरू बनण्याचा मार्ग प्रशस्त केला जात आहे. आम्ही 69 हजार शिक्षक भरतीच्या मागणीसोबत आहोत. आजचा युवक म्हणतो, आता भाजप नको, असं ट्विट यादव यांनी केलं आहे. आपचे खासदार संजय सिंग यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य कलं आहे. आदित्यनाथजी बेरोजगार तरूणांनी मारा पण लक्षात ठेवा, याच तरूणांनी तुम्हाला सत्तेत बसवलं आहे. बेरोजगारांवर होत असलेले अत्याचार तुमच्या सत्तेचा शेवट करेल, असे संजय सिंग यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT