Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra Latest News
Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra Latest News  Sarkarnama
देश

'Bharat Jodo' समारोपाला विरोधक जोडोचा प्रयोग; महाराष्ट्रातून ठाकरे-पवारांनाही पत्र, उपस्थित राहणार का?

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi News : कॉंग्रेस (Congress) नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा येत्या ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन करून या यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी २१ पक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

त्यामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला (ठाकरे गट) देखील निमंत्रण दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे 'भारत जोडो' यात्रेच्या समारोपाला विरोधक जोडोचाही प्रयोग होणार असल्याचं बोललं जात आहे.

राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात 'विरोधक जोडो'चा यशस्वी प्रयोग होणार काय? निदान कॉंग्रेसच्यावतीने या दिशेच्या प्रयत्नांना गती देण्यात आली आहे. ज्यात यात्रेच्या समारोपाच्या दिवशी (३० जानेवारी) देशातील प्रमुख विरोधी पक्षनेते एका व्यासपीठावर येऊ शकतात. यात्रेच्या समारोपात सहभागी होण्यासाठीचे आमंत्रण देऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी किमान २१ समविचारी पक्षांच्या अध्यक्षांना आज पत्र लिहिले आहे.

कॉंग्रेसचा हा प्रयोग यशस्वी झाला तर धर्मनिरपेक्षतेवर अतूट विश्वास असणाऱ्या पक्षांची २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच 'एकजूट' होण्याच्या दृष्टीने ते मोठे पाऊल ठरेल यात शंका नाही. भारत जोडो यात्रेला देशभरात जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला.

तर भारत जोडो यात्रेचा पंजाब टप्पा बुधवारपासून सुरू झालेला आहे. भारत जोडो यात्रेतून खूप काही शिकायला मिळालं असल्याचं राहूल गांधी यांनी या यात्रेदरम्यान सांगितलं.तर आज पंजाबमध्येही त्यांनी संघ-भाजपच्या विचारसरणीवर पुन्हा जोरदार हल्ला चढविला.

''भाजप आणि संघ समाजात सतत द्वेष पसरवत आहे. मात्र भारत बंधुता, एकता आणि आदर यावर विश्वास ठेवतो. त्यामुळेच भारत जोडो यात्रा यशस्वी झाली आहे'', असे राहूल गांधी यांनी यावेळी नमूद केले.

राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणार

तामिळनाडूमधून कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर २०२२ पासून सुरू झालेली भारत जोडो यात्रा ३० जानेवारी २०२३ रोजी श्रीनगरमध्ये संपेल. त्या दिवशी राहुल जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकवतील. आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमधून ही यात्रा गेली आहे.

केंद्र सरकारने राहूल गांधी यांच्या काश्मीरमधील प्रवासाला मात्र अद्याप अधिकृतरीत्या मंजुरी दिलेली नाही. या पार्श्वभूमीवरच काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की भारत जोडो यात्रेने आतापर्यंत ३३०० किलोमीटरचे अंतर कापले आहे.

या प्रवासात समरसता आणि समतेचा अत्यंत साधा आणि चिरस्थायी संदेश आहे. भारतीयांनी याच मूल्यांसाठी शतकानुशतके लढा दिला आहे आणि ते आपल्या संविधानात समाविष्ट आहेत. प्रवासाच्या सुरुवातीपासूनच आम्ही प्रत्येक समविचारी भारतीयाला प्रवासात येण्याचे आमंत्रण दिले आहे.

राहुल गांधींच्या निमंत्रणावरून अनेक राजकीय पक्षांचे खासदारही वेगवेगळ्या टप्प्यांवर यात्रेत सहभागी होत आहेत. ३० जानेवारी रोजी श्रीनगर येथे होणाऱ्या भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभाला मी तुम्हाला वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करतो.

द्वेष आणि हिंसाचाराशी लढण्यासाठी, सत्य, करुणा आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी आणि स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि सर्वांसाठी न्याय या घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सारे ३० जानेवारीला वचनबद्ध होऊ, असे आवाहन खर्गे यांनी केले आहे.

तसेच खर्गे पत्रात लिहीतात की, आपल्या देशावरच्या या संकटाच्या काळात जिथे लोकांचे लक्ष सार्वजनिक व जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरून पद्धतशीरपणे वळवले जात आहे, तिथे ही यात्रा एक शक्तिशाली आवाज म्हणून उदयास आली आहे. मला आशा आहे की तुम्ही त्यात सामील व्हाल आणि यात्रेचा 'संदेश' मजबूत कराल, असं त्यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT