नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद सुरूच आहे. या वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही. यातच पायलट यांनी थेट काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली आहे. पायलट यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा हाय कमांडकडे व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
पायलट यांनी 2020 मध्ये बंड पुकारले होते आणि ते मागे घेतल्यानंतर पक्षाने त्यांना काही आश्वासने दिली होती. ती अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यांना सरकार आणि पक्षात अद्याप काही स्थान देण्यात आलेले नाही. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाकडे मुख्यमंत्रिपद मागितले आहे. याबाबत त्यांनी सोनिया गांधींची आज भेट घेतली. आता पक्ष नेतृत्व पायलट यांच्याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मागील दोन वर्षांत काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर गळती लागली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील पायलट हे एकमेव नेते आता उरले आहेत. जोतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद आणि व्ही.पी.एन.सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पायलट यांनी थेटपणे गांधी कुटुंबासमोरच मुख्यमंत्रिपदाची मागणी ठेवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी 2018 मध्ये पक्षाला विजय मिळवून दिला होता. तरीही नेतृत्वाने अशोक गेहलोत यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी दिली होती.
काही दिवसांपूर्वी सचिन पायलट हे दिल्लीत गेले होते. त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. त्यांनी केलेल्या मागण्यांवर अद्याप पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. पायलट यांच्यासह त्यांच्या 18 समर्थक आमदारांनी 2020 मध्ये बंड केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून त्यांना काही आश्वासनं देण्यात आली होती. पण ही आश्वासनं अद्याप पूर्ण न झाल्यानं पायलट यांची नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.