Congress
Congress Sarkarnama
देश

प्रदेशाध्यक्ष वेळेत न आल्याने काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदाराने शपथच घेतली नाही!

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) दोन विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकांत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांना त्यांच्या जिल्ह्यातच मोठा धक्का बसला होता. हनगळमध्ये काँग्रेसचे (Congress) श्रीनिवास माने (Srinivas Mane) विजयी झाले होते. आता याच मानेंच्या आमदारकीची शपथ हुकली असून, याला कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार (D.K.Shivakumar) ठरले आहेत. मानेंना आता आमदारकीची शपथ घेण्यासाठी 13 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

विधानसभेचे अध्यक्ष विश्वनाथ हेडगे कागेरी हे नवनिर्वाचित दोन आमदारांना शपथ देणार होते. भाजपचे आमदार रमेश भुसानूनर यांच्यासोबत माने हे शपथ घेण्यासाठी विधानसभेच्या सभागृहात पोचले. परंतु, प्रदेशाध्यक्ष शिवकुमार वाहतूक कोंडीत अडकले होते. ते आले नसल्याने माने त्यांना शोधण्यासाठी गेले. या काळात विधानसभा अध्यक्षांनी भुसानूर यांना शपथ दिली. नंतर मानेंचा शपथ घेण्यासाठी क्रमांक आल्यानंतर ते पोचले नाहीत. विधानसभा अध्यक्षांनी काही काळ वाट पाहिली. त्यांनी माने यांना शोधून आणण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले. परंतु, माने सापडले नाहीत.

काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सलीम अहमद हे सभागृहात उपस्थित होते आणि तेही माने यांच्याशी सातत्याने संपर्क साधून लवकर येण्याची विनंती करीत होते. काही वेळानंतरही माने आले नसल्याने विधानसभा अध्यक्ष चिडले आणि त्यांनी हे वर्तन असभ्य असल्याचे सांगितले. यानंतर ते तडक सभागृहातून निघून गेले. आता विधानसभेचे अधिवेशन 13 डिसेंबरला होणार असून, त्यावेळी माने यांना आमदारकीची शपथ मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असल्याने बोम्मई यांच्यासाठी या पोटनिवडणुका नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणाऱ्या होत्या. परंतु, त्यात त्यांना फटका बसला होता. हनगळ हा मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. येथून काँग्रेसचे श्रीनिवास माने विजयी झाले तर भाजप दुसऱ्या आणि जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर राहिला. सिंदगीमध्ये भाजपने विजय मिळवला. तेथे भाजपचे उमेदवार रमेश भुसानूर हे विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे अशोक मानगुळी होते.

आधी हनगळची जागा भाजपकडे तर सिंदगीची जागा धर्मनिरपेक्ष दलाकडे (जेडीएस) होती. हनगळचे आमदार सी.एम.उदासी यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. जेडीएसचे एम.सी.मानगुळी यांच्या निधनाने सिंदगीची जागा रिक्त जागा झाली होती. या जागांसाठी भाजपसह काँग्रेस आणि जेडीएसने जोर लावला होता. परंतु, हनगळ काँग्रेसकडे तर सिंदगी भाजपकडे गेली होती. यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांना पक्षातूनच लक्ष्य करण्यात येत आहे.

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT