<div class="paragraphs"><p>BJP and Congress </p></div>

BJP and Congress

 

Sarkarnama

देश

राणेंना आजन्म कॅबिनेट दर्जा देण्याचा भाजपचा निर्णय वादात; काँग्रेसने घेतला आक्षेप

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) धामधूम सुरू आहे. यातच काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांना आजन्म कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय राज्यातील भाजप (BJP) सरकारने घेतला आहे. राणेंनी त्यांचे पुत्र भाजप नेते व आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. याला काँग्रेसने विरोध केला आहे.

प्रतापसिंह राणेंना आजन्म कॅबिनेट दर्जा देण्यास काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राव म्हणाले की, याला घटनात्मकदृष्ट्या परवानगी आहे का? राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारच्या राजकीय खेळी करू नयेत. तुमच्या सवंग राजकारणासाठी प्रतापसिंह राणेंसारख्या मोठ्या व्यक्तीचा वापर करणे चुकीचे आहे. भाजपने अशा प्रकारचे राजकारण करणे लज्जास्पद आहे.

याबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले होते की, आमच्या सरकारने ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांना आजन्म मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष अशी महत्वाची पदे भूषवली आहेत. गोव्यातील सर्व स्तरातील जनतेला ते कायम प्रेरणादायी ठरले आहेत. राज्य आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करीत असताना कायम त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला आवश्यकता आहे. भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.

काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलतानाच प्रतापसिंह राणे यांनी नुकताच निवृत्तीचा बॉम्ब टाकला होता. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. ते म्हणाले होते की, मी राजकारणात सुमारे 50 वर्षे पूर्ण केली आहेत. आता मला विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे. मला आता वाटत आहे की मी आराम करून नव्या पिढीला संधी द्यावी. गोवा प्रगतीशील राज्य असून, तरुणांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

राणे यांनी मुलाच्या विरोधात लढण्याची घोषणा 21 डिसेंबरला केली होती. यानंतर काँग्रेसने तातडीने पावले उचलत राणे यांना पोरीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. प्रतापसिंह राणे हे 82 वर्षांचे असून, ते 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी पुत्राच्या विरोधातच निवडणूक लढण्याची घोषणा करुन राज्यात राजकीय भूकंप घडवला होता. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातले राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता राणे-पिता पुत्रांच्या लढतीने त्यात भर पडली होती.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनेही जोर लावला असला तरी प्रत्यक्षात मागील निवडणुकीएवढी ताकद आता राहिलेली दिसत नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला 40 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक आमदार काँग्रेसचे होते पण त्रिशंकू स्थितीमध्ये काँग्रेसला चकवा देत भाजपने सत्ता स्थापन केली होती. हीच काँग्रेसची धूळधाण उडण्याची सुरूवात होती. आता राज्यात काँग्रेसचे केवळ 2 आमदार उरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT