Priyank Kharge RSS Sarkarnama
देश

Priyank Kharge RSS : 'RSSची नोंदणी करा, शुल्क मी भरतो!' 44 हजार काडतुसांच्या तस्करीवरून प्रियांक खरगेंचा मोहन भागवतांना टोला!

Priyank Kharge questions RSS and BJP over the alleged links in the Khadki ammunition smuggling case and challenges Mohan Bhagwat on RSS registration : पुणे येथील खडकी दारूगोळा कारखान्याशी संबंधित तस्करी प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कथित संबंध असलेल्या आरोपींचा दावा; भाजप आणि RSSला काँग्रेसचे कर्नाटकमधील गृहमंत्री प्रियांक खरगेंनी घेरले.

Pradeep Pendhare

Priyank Kharge questions RSS over ammunition smuggling : बिहार आणि हरियाणामध्ये 44 हजार 250 जिवंत काडतुसे जप्त झाल्यानंतर आंतरराज्यीय दारूगोळा तस्करीचे मोठे जाळे समोर आले आहे. पुण्यातील खडकी दारूगोळा कारखान्याशी संबंधित या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) कथित संबंध असलेल्या व्यक्तींची नावे समोर आल्याचा दावा काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी केला आहे.

या प्रकरणावरून त्यांनी थेट RSS आणि भाजपला लक्ष्य करत राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित पाच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

विशेष कृती दल (STF) आणि तपास यंत्रणांच्या कारवाईत चंदन तिवारी, अभिषेक तिवारी, ललटू कुमार आणि सारस कुमार यांच्यासह अनेक व्यक्तींना अटक झाली आहे. यातील काही आरोपींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या (RSS) गणवेशातील कथित फोटो समोर आल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे ही केवळ दारूगोळा तस्करीची घटना नसून देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब असल्याचे सांगत त्यांनी भाजप आणि RSSकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

तस्करी प्रकरणातील आरोपींचे RSSच्या गणवेशातील कथित फोटो समोर आले आहेत. हे आरोपी संघाचे स्वयंसेवक होते का? संघटनेत त्यांच्याकडे कोणती पदे होती? ते स्वयंसेवक असतील, तर काडतूस तस्करी प्रकरणात त्यांचा नेमका सहभाग काय होता? ते कोणासाठी काम करत होते आणि त्यांचा उद्देश काय होता? असे प्रश्न काँग्रेसचे (Congress) प्रियांक खरगे यांनी उपस्थित केले.

एवढ्या मोठ्या प्रमाणातील जिवंत काडतुसांचा साठा नेमका कुठे पाठवला जाणार होता? ही काडतुसे संघटित गुन्हेगारी टोळ्या, कट्टरतावादी गट किंवा अन्य बेकायदेशीर कारवायांसाठी वापरली जाणार होती का? एवढ्या मोठ्या प्रमाणातील दारूगोळ्याचा संभाव्य वापर काय होता, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे खरगे यांनी म्हटले.

पुण्यातील खडकी दारूगोळा कारखान्याशी संबंधित खुणा जप्त काडतुसांवर असल्याचा दावा करत खरगे यांनी सरकारी कारखान्यात तयार झालेला दारूगोळा बेकायदेशीर बाजारपेठेत कसा पोहोचला, असा सवाल केला. हा दारूगोळा बाहेर वळवण्यासाठी कोणी मदत केली? परवानाधारक शस्त्रविक्रेते किंवा मध्यस्थांचा यात सहभाग होता का? हे तस्करीचे जाळे किती काळापासून कार्यरत होते आणि त्याचा विस्तार किती मोठा आहे? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

भाजप आणि RSS गप्प का आहेत?

राष्ट्रवाद, देशभक्ती आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवरून भाजप सातत्याने भूमिका मांडत असतो. मात्र, एवढ्या मोठ्या काडतूस तस्करी प्रकरणात RSSशी कथित संबंध असलेल्या व्यक्तींची नावे समोर येत असताना भाजपकडून ठोस प्रतिक्रिया का दिली जात नाही? संबंधित प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची मागणी भाजप का करत नाही? असा सवाल खरगे यांनी केला.

RSSची अधिकृत नोंदणी का नाही?

या प्रकरणाच्या निमित्ताने प्रियांक खरगे यांनी RSSच्या अधिकृत नोंदणीचा मुद्दाही पुन्हा उपस्थित केला. एखादी संघटना लाखो स्वयंसेवक असल्याचा दावा करते; मात्र गंभीर गुन्हेगारी आरोप समोर आल्यानंतर संबंधित व्यक्तींशी संबंध नसल्याचे सांगून जबाबदारी झटकू शकत नाही, असे ते म्हणाले. संघटनेची अधिकृत नोंदणी आणि सदस्यत्वाच्या नोंदी असल्यास संबंधित व्यक्तींचे संघटनेशी असलेले संबंध पडताळणे आणि जबाबदारी निश्चित करणे सोपे होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला. इतरांकडून उत्तरदायित्वाची अपेक्षा करणाऱ्या RSSला त्याच निकषांवर प्रश्न का विचारले जाऊ नयेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

'मोहन भागवतांनी नोंदणी करावी, शुल्कही मी भरतो'

RSSच्या नोंदणीचा मुद्दा उपस्थित करत प्रियांक खरगे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना थेट टोला लगावला. RSSची अधिकृत नोंदणी किती महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन ती करून देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेण्यास तयार आहोत. एवढेच नव्हे, तर नोंदणीचे शुल्कही स्वतः भरण्यास आनंदाने तयार असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणात तपास यंत्रणा काय निष्कर्ष काढतात आणि RSS व भाजपकडून यावर काय भूमिका मांडली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT