ourt directs police to register FIR against actress Kangana Ranaut
ourt directs police to register FIR against actress Kangana Ranaut  
देश

कंगना राणावत अडचणीत...एफआयआर दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

वृत्तसंस्था

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. त्यानंतरही कंगनाने वादग्रस्त वक्तव्य करणे सुरूच ठेवले होते. कंगनाला यातील एक वादग्रस्त वक्तव्य भोवले असून, कर्नाटकातील न्यायालयाने पोलिसांना तिच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे कंगना आता चांगलीच अडचणीत आली आहे. 

कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात रोज जोरदार सामना रंगला होता. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले होते. तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंगना मुंबई सोडून हिमाचल प्रदेशला तिच्या घरी परतली होती. तेथूनही तिने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कायम ठेवली होती. 

कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरात वातावरण पेटले होते. शेतकरी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते. याबद्दल कंगनाने वादग्रस्त ट्विट केले होते. तिने म्हटले होते की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल चुकीची माहिती आणि अफवा पसरवणारे तसेच, दंगल घडवणारेच हेच लोक आता कृषी विधेयकांवर चुकीची माहिती पसरवत आहेत. देशात ते दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. 

या प्रकरणी वकील एल. रमेश नाईक यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. कंगनाने शेतकरीविरोधी ट्विट केले असून, तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. यावर न्यायाधीशांनी पोलिसांना या प्रकरणी कंगनावर एफआयआर दाखल करुन चौकसी करण्याचे निर्देश दिले आहेत. या ट्विटमुळे भावना दुखावल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. 

कंगनाने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावर तिला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा शिवसेनेने दिला होता. कंगनाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले असल्याने केंद्रातील मोदी सरकारने तिला 'वाय' सुरक्षा दिली आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले होते. यावर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांना लक्ष्य केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT