CTET September 2026  Sarkarnama
देश

CTET Exam : ‘CTET’ परीक्षा लांबणीवर; उमेदवारांमध्ये नाराजी, परीक्षेसाठी एक सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

CTET Exam Postpone : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी नोंदणी न केलेल्या उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मिनाक्षी गुरव : सरकारनामा ब्यूरो

CTET Exam Postpone : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी नोंदणी न केलेल्या उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा उमेदवारांना आता एक सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. सीटीईटी परीक्षेची नवीन तारीख स्वतंत्रपणे जाहीर करणार असल्याचे ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात २८ जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली आणि आता सीटीईटी परीक्षा पुढे ढकल्याने सर्व परीक्षार्थीतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सीबीएसईतर्फे २२ व्या सीटीईटीसाठी ११ मे ते १० जून या कालावधीत अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा सहा सप्टेंबरला घेण्यात येणार, असे जाहीर करण्यात आले. पण शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना पुरेशी संधी देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांच्या व्यापक हिताचा विचार करून प्रस्तावित ‘सीटीईटी’साठी नोंदणी करू न शकलेल्या उमेदवारांना नोंदणीसाठी संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे ‘सीबीएसई’ने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने सुरू केलेल्या नोंदणी प्रक्रियेत पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही सीबीएसईने परिपत्रकात नमूद केले आहे.

परीक्षार्थींमध्ये कमालीची अस्वस्थता

शिक्षक सेवेत कायम राहण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी अथवा सीटीईटी परीक्षा सक्तीची केली आहे. तसेच शिक्षक होऊ पाहणाऱ्या उमेदवारांनाही ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षांमधील सततच्या विघ्नांमुळे उमेदवारांमध्ये तीव्र संताप आणि नैराश्य पसरले आहे. गेल्या २८ जून २०२६ रोजी महाराष्ट्रात टीईटी आयोजित करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी पेपर फुटल्याचे उघडकीस आल्याने ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. दोन महिने झाले तरी शिक्षण विभागाने अद्याप परीक्षेची नवीन तारीख जाहीर केलेली नाही. या धक्क्यातून उमेदवार सावरत नाहीत तोच, आगामी ६ सप्टेंबर रोजी होणारी सीटीईटी परीक्षा देखील अचानक पुढे ढकलण्यात आली आहे.

परीक्षा अगदी तोंडावर आलेली असताना अशा प्रकारे अचानक पेपर फुटणे किंवा तारखा पुढे ढकलल्या जाणे, यामुळे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सहा महिने अभ्यासाची घेतलेली मेहनत एका झटक्यात वाया जात असल्याने कमालीचे नैराश्य आले आहे. या प्रशासकीय ढिसाळ कारभाराचा थेट फटका केवळ उमेदवारांनाच नव्हे, तर राज्याच्या संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राला बसत आहे. शासनाने या परीक्षा यंत्रणेतील त्रुटी तातडीने दूर करून परीक्षा पारदर्शक व निर्धारित वेळेत घ्याव्यात, अशी जोरदार मागणी आता राज्यभरातील उमेदवारांकडून केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT