<div class="paragraphs"><p>Narendra Modi  </p></div>

Narendra Modi

 

Sarkarnama

देश

मोदींकडून 15 वर्षांपुढील मुलांसाठी लशीची घोषणा, पण DCGI चा निर्णय वेगळाच...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी लसीकरणासंबधी (Corona Vaccination) तीन मोठ्या घोषणा केल्या. त्यात 15 ते 18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले जाणार आहे. तसेच आरोग्य व इतर फ्रंटलाईन वर्कर्ससाठी प्रिकॉशन डोस दिले जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मुलांसाठी लसीकरणाची घोषणा केल्यानंतर आता भारतीय औषध महानियंत्रकांचं (DCGI) लशीला परवानगी दिल्याचं पत्र समोर आलं आहे.

मागील काही दिवसांपासून सरकारकडून लहान मुलांसाठी लस सुरू केली जाणार असल्याची चर्चा होती. सध्या 18 वर्षांपुढील मुलांसाठी लस उपलब्ध आहे. त्याखालील मुलांसाठी भारतात भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन (Covaxin) या लशीच्या चाचण्या सुरू आहेत. काही टप्प्यांतील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर कंपनीकडून 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन लसीकरणाची परवानगी औषध महानियंत्रकांकडे केली होती. त्यानुसार 24 डिसेंबर रोजी ही परवानगी देण्यात आली आहे.

महानियंत्रकांकडून याबाबतचे कंपनीला दिलेले पत्र आता समोर आले आहे. कंपनीला परवानगी मिळाल्यानंतर मोदींनी दुसऱ्याच दिवशी 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाची घोषणा केली आहे. पण कंपनीला मिळालेल्या परवानगीचे पत्र समोर आल्यानंतर आता त्यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. पत्रामध्ये स्पष्टपणे 12 ते 18 वयोगटाचा उल्लेख करण्यात आला आहे. पण पंतप्रधानांकडून 15 वर्षांपुढील मुलांसाठी लस असल्याचे जाहीर केले आहे.

पंतप्रधानांकडून शनिवारी आपल्या संवादामध्ये याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. प्रत्यक्षात देशभरात चाचण्या पूर्ण केल्यानंतर कंपनीकडून आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागण्यात आली होती. महानियंत्रकांकडून 12 वर्षांपुढील मुलांसाठी परवानगी दिली आहे. पण त्यानंतरही मोदींकडून 15 वर्षांपुढील मुलांसाठीही लस देण्याची घोषणा केली आहे. यावरून आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

शनिवारी काय म्हणाले मोदी?

मास्कचा भरपूर उपयोग करा. हात वारंवार धुणे हे विसरू नका. व्हायरस म्युटेड होत असला तरी आपला आत्मविश्वासही वाढत आहे. आता देशाजवळ 18 लाख आयसोलेशन बेड आहेत. 5 पाच लाख आयसोलेशन बेड, 1 लाख 40 हजार आयसीयू बेड आणि मुलांसाठी 90 हजार बेड उपलब्ध आहेत. चार लाख आॅक्सिजन सिलिंडर देशभरात दिले आहेत. बफर डोस तयार करायला राज्यांना सहकार्य करण्यात येत आहे. व्यक्तिगत स्तरावरील सर्व नियमांचे पालन हेच कोरोनाच्या विरोधात लढण्याचे मोठे हत्यार आहे. दुसरे हत्यार म्हणजे लस. लसनिर्मीतीसाठी अनेक आपण निर्णय घेतले. त्यामुळे लसनिर्मिती आणि त्याचे वाटप हे नियोजनबद्ध करण्यात आले. आतापर्यंत 141 कोटी व्हॅक्सिन डोन देण्याचे उद्दीष्ट भारताने पूर्ण केले आहे. ही मोठी कामगिरी असल्याचे मोदी यांनी सांगितले. गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश अशा राज्यांनी सिंगल डोस हा शंभर टक्के पूर्ण केला आहे. देशात लवकरच डीएनए व्हॅक्सिनही उपलब्ध होणार आहे.

गेल्या 11 महिन्यांत देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. त्याचा फायदा नागरिकांच्या लक्षात येत आहे. त्यांची रोजचे जीवन सामान्य होत आहे. आर्थिक आघाडीवर उत्साहवर्धक वातावरण आहे. तरीही कोरोना गेलेला नाही, हे आपल्याला माहिती आहे. त्यासाठी सतर्कता आवश्यक आहे. देशाला आणि देशवासियांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही निरंतर काम केले आहे. व्हॅक्सीन देण्यासाठी पहिला डोस कोणाला, दोन डोसमध्ये अंतर किती असे अनेक निर्णय सतत घेतले गेले. भारताच्या परिस्थितीनुसार भारतातील वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसारच निर्णय आपण घेतले, असे ते म्हणाले. ओमिक्राॅनबद्दल अनेक उलटसुलट मते व्यक्त होत आहे. भारतीय वैज्ञानिक यावर लक्ष ठेवून आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT