Arvind Kejriwal, Narendra Modi Sarkarnama
देश

Delhi Assembly Election : महायुतीने सेट केलेला नॅरेटिव्ह दिल्लीत भाजपवर उलटणार? केजरीवालांचा ‘प्लॅन’ तयार

Arvind Kejriwal Mahayuti AAP BJP Politics Revdis : महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजना बंद होईल, असा प्रचार महायुतीने केला होता.

Rajanand More

New Delhi : दिल्लीमध्ये फेब्रुवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने आम आदमी पक्ष आणि भाजपमध्येच थेट लढत होणार आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात महायुतीने सेट केलेल्या नॅरेटिव्हचाच वापर दिल्लीत करून भाजपला अडचणीत आणण्याचा प्लॅन केजरीवालांनी तयार केला आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजना तसेच इतर योजनांवरून महाविकास आघाडीला घेरले होते. आघाडीची सत्ता आल्यास या योजना बंद होईल, असा प्रचार महायुतीच्या नेत्यांनी केला होता. राज्यभरात होर्डिंग, पत्रके तसेच टीव्हीवरील जाहिरातींमधूनही याच मुद्यावरून आघाडीविरोधात प्रचार करण्यात आला.

भाजपकडून विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधील विविध योजनांना ‘रेवडी’ म्हटले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचारसभांमध्ये यापूर्वी निशाणा साधला होता. तोच मुद्दा उचलून धरत केजरीवालांनी ‘रेवडी पर चर्चा’ वर तब्बल 65 हजार बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरूवात शुक्रवारपासून झाली. या बैठकांमधून आप सरकारकडून जनतेला त्यांच्याच पैशातून दिल्या जाणाऱ्या मोफतच्या सहा रेवड्या दिल्या जात असून भाजप सत्तेत आल्यास ते बंद होईल, असे लोकांना पटवून दिले जाणार आहे.

दिल्लीकरांना मिळणाऱ्या सहा रेवड्यांचे संरक्षण करण्यासाठी आपची सत्ता यायला हवी, असा प्रचार आता केजरीवालांनी सुरू केला आहे. यामध्ये 24 तास मोफत वीज, मोफत पाणी, मोफत शिक्षण, मोफत मोहल्ला क्लिनिक आणि सरकारी रुग्णालये, महिलांसाठी मोफत बसप्रवास आणि ज्येष्ठांसाठी मोफत तीर्थ यात्रा या सहा योजनांचा समावेश आहे.

भाजपची सत्ता 20 राज्यांमध्ये असून एकाही राज्यात मोफत रेवडी दिली जात नाही. कारण त्यांना ते द्यायचे नाही. केवळ ‘आप’लाच या सुविधा कशा दिल्या जातात, हे माहिती आहे, असे केजरीवालांनी पहिल्या बैठकीत सांगितले. त्यामुळे आपचा भर निवडणुकीच्या प्रचारात याच मुद्द्यांवर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्याला भाजपसह काँग्रेसकडून कसे प्रत्युत्तर दिले जाणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT