Delhi Assembly Election 2025 Sarkarnama
देश

Delhi Assembly Elections 2025: दिल्लीत काँग्रेसची मोठी खेळी; केजरीवालांनंतर आता CM आतिशींना रोखण्यासाठी तगडा प्लॅन

Congress Vs AAP : आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसनं आता दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखल्याचे बोलले जात आहे.

Deepak Kulkarni

Delhi Assembly Elections 2025 : महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. ही निवडणूक फेब्रुवारीमध्ये होणार असून,आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक स्वबळावर लढवत सत्तेची हॅट्ट्रिक साधण्यासाठी जोरदार रणनीती आखल्याची चर्चा आहे.तर काँग्रेसनंही (Congress) 'आप'चं दिल्लीतील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे.

दिल्लीवर एकेकाळी एकहाती सत्ता राखणाऱ्या काँग्रेसनं गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभवाला सामोरे जाताना भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र, पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच होत असलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने मोठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

आपचे (AAP) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसनं आता दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांना घेरण्यासाठी व्यूहरचना आखल्याचे बोलले जात आहे.दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात कालकाजी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस फायरब्रँड नेत्या अलका लांबा यांच्या नावावर हायकमांडनं पसंती दिल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच काँग्रेसनं 'आप'वर कुरघोडी करत 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.त्यात नवी दिल्लीतून अरविंद केजरीवालांच्या विरोधात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दीक्षित हे माजी केजरीवाल यांचे कट्टर विरोधक आहेत. आता आपच्या उमेदवारांविरोधात तगडे उमेदवार देत यंदाची निवडणूक आम आदमी पार्टीसाठी नक्कीच सोपी नसणार असल्याचे संकेतच काँग्रेसनं दिले आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा तयार करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची मंगळवारी (ता. 24) महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्ध अलका लांबा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

तसेच जंगपुरामधून फरहाद सुरी,मटिया महल मतदारसंघातून आसिम अहमद,सीमापुरी येथून राजेश लिलोठिया,आणि बिजवासनमधून देवेंद्र सहरावत यांची नावं निश्चित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. आपचे माजी आमदार आसिम अहमद खान व देवेंद्र सहरावत यांनी सोमवारी (ता.23) काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत मंगळवारी(ता.24) दिल्लीतील 35 जागांवरील संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली. त्यात 28 जागांवरील उमेदवारांची नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, 7 जागांवरचा निर्णय पुढील काही दिवसांत मार्गी लावण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे.

संदीप दीक्षित यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांच्यावर नेहमीच आगपाखड केली जाते. त्यामागचं कारण म्हणजे 2013 च्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा नवी दिल्ली मतदारसंंघातून पराभव केला होता. केजरीवाल यांना 44,269 तर शीला दीक्षित यांना 18,405 मते मिळाली होती. केजरीवाल यांनी दीक्षित यांचा 25 हजार 864 अशा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. हाच पराभव दीक्षित यांच्या राजकीय कारकीर्दीतला ब्रेक लावणारा ठरला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT