Kangana Ranaut  Sarkarnama
देश

कंगना हाजिर हो! विधानसभेसमोर होणार झाडाझडती

शिखांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कंगना राणावत आता चांगलीच अडचणीत आली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भारताला (India) 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य (Independence) हे भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्येच मिळाले, या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) वादात सापडली होती. यानंतर तिने शिखांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे ती आता चांगलीच अडचणीत आली आहे. या प्रकरणी दिल्ली विधानसभेच्या समितीसमोर हजर राहण्याचा आदेश तिला बजावण्यात आला आहे.

दिल्ली विधानसभेच्या शांतता व सलोखा समितीसमोर तिला 6 डिसेंबरला हजर व्हावे लागणार आहे. या समितीचे प्रमुख आम आदमी पक्षाचे नेता राघव चढ्ढा आहेत. तिने सोशल मीडियावर शीख समुदायाबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. या प्रकरणी आता कंगना चांगलीच अडचणीत आल्याचे मानले जात आहे. दिल्ली विधानसभेत तिची झाडाझडती घेतली जाणार आहे.

मुंबईतही कंगनाविरोधात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. मुंबईतील व्यावसायिक आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने ही तक्रार दिली आहे. याचबरोबर शिरोमणी अकाली दलानेही कंगनाच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात वर्षभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला खलिस्ताना ठरवून शेतकऱ्यांचा उल्लेख खलिस्तानी दहशतवादी असा कंगनाने केला आहे.

कंगनाविरोधात आधी मुंबई पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एकदा कंगना मुंबई पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. तिच्या विरोधात आता आम आदमी पक्षाने (AAP) आघाडी उघडली आहे. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रिती शर्मा मेनन यांनी याबाबत तक्रार केली आहे. कंगनाने देशद्रोही आणि भावना भडकावणारे वक्तव्य केले आहे. यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

भाजपचे खासदार वरूण गांधी यांनीही कंगनाला सुनावले होते. त्यांनी कंगनाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या विचारांना वेडेपणा म्हणावा की देशद्रोह, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता तर थेट हुतात्मा मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान! या विचारांना मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT