Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : ...यासाठी मला 'नोबेल' मिळायला हवा; केजरीवालांनी अचानकच केली मागणी

Anand Surwase

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजप सरकार यांच्यातील संघर्ष सर्वश्रृत आहे. त्यातच आता केजरीवाल यांनी केंद्रातील भाजप सरकार दिल्लीकरांच्या समस्या सोडवण्यामध्ये बाधा आणण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच राजधानी दिल्लीत मी कशा प्रकारे सरकार चालवत आहे, हे मलाच माहिती आहे. त्यासाठी मला नोबेल पुरस्कार मिळायला हवा, अशी मागणीच Arvind Kejriwal यांनी केली आहे.

केजरीवाल सरकार दिल्लीतील जनतेकडून चुकीच्या पद्धतीने आकारण्यात येणारी पाणीपट्टी माफ करण्याची योजना लागू करण्याच्या विचारात आहे. मात्र, भाजपकडून त्यामध्ये खोडा घालण्याचे काम केले जात आहे. त्याविरोधात आम आदमीच्यावतीने दिल्लीमध्ये रविवारी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी केजरीवाल बोलत होते.

जर दिल्लीमध्ये आज भाजपचे सरकार अस्तित्वात असते तर आतापर्यंत लोकांचे नळ कनेक्शन कापले गेले असते. मात्र आता दिल्लीकरांना जर वाटत असेल की पाणीपट्टी योग्य आकारण्यात आली आहे, तरच ती भरा अन्यथा भरण्याची गरज नसल्याचे आवाहन केले. कारण आता राजधानीमध्ये आम आदमीचे सरकार आहे. भाजपची गुंडगिरी नाही, असा निशाणाही त्यांनी यावेळी भाजपवर साधला आहे.

आंदोलनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केजरीवाल म्हणाले, 'केंद्र सरकारकडून दिल्लीतील शाळा आणि रुग्णालयांचे बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच भाजप नेत्यांना त्यांच्या मुलांना ज्या प्रकारचे चांगले शिक्षण मिळत आहे, तसे शिक्षण गरिबांच्या मुलांना मिळू नये, असे वाटत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला. याशिवाय राजधानी दिल्लीमध्ये मी अशा प्रकारच्या शाळा निर्माण करणार आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाला त्याचा हेवा वाटेल. मात्र, भाजपकडून शाळांच्या निर्मितीमध्ये बाधा आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शाळेच्या बांधकामात खोडा घालण्यासोबतच केंद्र सरकारकडून दिल्लीकरांसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या रुग्णालयांच्या कामामध्ये देखील अडथळे आणण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. या सर्व गोष्टी मी रोज उठून जनेतला सांगू शकत नाही. मात्र माझ्या मनाला माहिती आहे, की मी हे सरकार कसे चालवत आहे. भाजपच्या नेत्यांनी आणि दिल्लीच्या गव्हर्नरने लोकांना कशा प्रकारे यातना देण्याचे काम केले. याउलट मी दिल्लीकरांचा पूत्र म्हणून ज्या प्रमाणे त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यासाठी तर मला नोबेल पुरस्कार मिळायला हवा, असे केजरीवाल म्हणाले.

'मला नोबेल पुरस्कार मिळायला हवा हे खरे आहे. मात्र, माझा नोबेल पुरस्कार म्हणजे ही दिल्लीची जनता असल्याचा स्पष्टीकरण देत जनतेच्या मनात आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मी दिल्लीतील विविध भागांचे दौरे केले असता मला नागरिकांचा फक्त माझ्यावर विश्वास असल्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या असल्याचा दावाही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT