Delhi AAP Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : मंत्र्यांनी धरले भाजप आमदाराचे पाय; ही तर भारतीय लोकशाही त्यांच्या पायाशी...

Rajanand More

New Delhi : दिल्लीत शनिवारी मोठा ड्रामा पाहायला मिळाला होता. दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी भाजप नेते व विधानसभेतील पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांचे पाय धरल्याचा फोटो तुफान व्हायरल झाला. त्यावरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, आप व भाजपचे आमदार बस मार्शल्सना पुन्हा सेवेत घेण्याच्या मागणीला मंजुरीसाठी नायब राज्यपालांकडे गेले होते. त्याआधी मंत्रालयातून भाजपचे आमदार येण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे आप आमदारांनी त्यांना अडवले होते. त्याचवेळी भारद्वाज यांनी गुप्तांचे पाय धऱत नायब राज्यपालांकडे येण्याची विनंती केली, असा दावा आपचे नेते करत आहेत. हाच फोटो व्हायरल झाला आहे.

या घटनेवरून केजरीवालांनी भाजपवर टीका केली आहे. रविवारी छत्रसाल स्टेडिअममधील जनता की अदालत या कार्यक्रमामध्ये बोलताना या घटनेचा उल्लेख करून ते म्हणाले, मार्शल्सला पुन्हा सेवेत घेण्यासाठी सौरभ भारद्वाज यांनी भाजप नेत्यांचे पाय पकडले. 62 आमदार असलेल्या पक्षाचा नेता 8 आमदार असलेल्या पक्षातील नेत्यांच्या पायाशी गेला. काल सौरभ भारद्वाज नव्हे तर या देशाची लोकशाही भाजपच्या पायांवर आक्रोश करत होती.

भाजपच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच केजरीवालांनी भाजप गरीब विरोधी पक्ष असल्याचे सांगितले. गरीबांच्या नोकऱ्या भाजप हिसकावून घेत आहे. 15 हजार पगार असलेल्या बस मार्शल्सना हटवून बेरोजगार करण्यात आले. अनेक सफाई कामगारांना हटवल्याचे मी जेलमध्ये असताना समजले होते. त्यामुळे भाजप तुमच्या हिताचा विचार करणारा पक्ष नाही, अशी टीका केजरीवालांनी केली.

महाराष्ट्रातही डबल इंजिन फेल

हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसची दोन्ही राज्यांत सत्ता येण्याची शक्यता आहे. यावरून केजरीवालांनी भाजपवर निशाणा साधला. दोन्ही राज्यांतून डबल इंजिन सरकार हद्दपार होणार आहे. देशात डबल इंजिन फेल ठरले आहे. पहिले इंजिन जून महिन्यात २४९ जागा मिळाल्या तेव्हा फेल झाले. दुसरे इंजिन झारखंड आणि महाराष्ट्रातही फेल होईल. डबल इंजिन सरकारमध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, हे लोकांना समजले आहे, असे केजरीवाल म्हणाले.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT