Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : निवडणूक संपली अन् अंतरिम जामीनाची मुदतही... केजरीवाल ‘बॅक टू जेल’!

Rajanand More

Arvind Kejriwal in Tihar Jail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रविवारी तिहार जेलमध्ये सरेंडर करावे लागले. सुप्रीम कोर्टाने लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी दिलेल्या अंतरिम जामीनाची मुदत शनिवारी संपली. केजरीवालांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला असला तरी त्यावर पाच जूनला निकाल येणार आहे.

दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ईडीने केजरीवालांना अटक केली आहे. निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना 21 दिवसांचा अंतरिम जामीन दिला होता. त्यानुसार केजरीवालांनी जोरदार प्रचारही केला. यादरम्यान त्यांनी सात दिवसांच्या मुदतवाढीसाठी कोर्टात अर्ज केला होता. पण अर्ज दाखल करून घेण्यात आला नाही.

सुप्रीम कोर्टाने अर्ज दाखल करून घेण्यास नकार दिल्यानंतर केजरीवाल स्थानिक न्यायालयात गेले. पण तिथेही जामीनावर पाच जूनला निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे केजरीवालांना रविवारी पुन्हा तिहार जेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानुसार ते दुपारी सरेंडर झाले. त्यानंतर कोर्टाने त्यांना पाच जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

जेलमध्ये जाण्यापुर्वी केजरीवाल यांनी पत्नी सुनिता व पक्षाच्या इतर नेत्यांसह राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर एका हनुमान मंदिरातही माथा टेकवला. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. न्यायपालिकेचा सन्मान करत असल्याने निश्चित तारखेला सरेंडर करत असल्याचे ते म्हणाले.

एक्झिट पोलवरून टीका

जेलमध्ये जाण्यापुर्वी केजरीवालांनी एक्झिट पोलवरून भाजपवर टीका केली. एक्झिट पोलच्या मागे एक थेअरी आहे. त्यांच्या मित्रांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत. एक्झिट पोलनंतर बाजार उघडताच वाढून त्यांना फायदा व्हावा, अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हेराफेरी करता यावी, मोदी आणि शाहांना आरएसएसमधून होणारा विरोध थांबवता यावा, यासाठी हे सुरू आहे.

मी भगत सिंग यांचा भक्त आहे. ते देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जेलमध्ये गेले होते. मी देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जात आहे. भगत सिंग फासावर गेले होते. मीही फासावर जायला तयार आहे. यावेळी मी कधी परत येईन, माहिती नाही. माझ्यासोबत हे लोक काय करतील, माहित नाही. पण मी झुकणार नाही, असे केजरीवाल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT