delhi surgeon anil kumar rawat who got second covid vaccine die of covid
delhi surgeon anil kumar rawat who got second covid vaccine die of covid  
देश

मी लशीचे दोन्ही डोस घेतले असून मला काही होणार नाही, असं म्हणणारे डॉक्टर कोरोनाशी झुंज हरले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना लशीचे (covid vaccine)  दोन्ही डोस घेतलेले दिल्लीतील सर्जन डॉ.अनिलकुमार रावत (Anil Kumar Rawat) यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले त्यावेळी ते सहकाऱ्यांना आपण कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्याचे सांगत होते. यातून मी लवकर बाहेर येणार, असा धीरही ते सहकाऱ्यांना देत होते. परंतु, अखेर ते कोरोनाशी झुंज हरले. 

दिल्लीतील सरोज हॉस्पिटल 1996 मध्ये सुरू झाल्यापासून डॉ. रावत (वय 58)  तेथे कार्यरत  होते. ते सहकाऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. त्यांनी कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस मार्चच्या सुरवातीला घेतला होता, अशी माहिती सरोज हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ.पी.के.भारद्वाज यांनी दिली. ते म्हणाले की, रावत माझ्या मोठ्या मुलासारखे होते. मौलाना आझाद कॉलेजमधूल त्यांनी एमएम केले होते. आर.बी.जैन रुग्णालयातील माझ्या युनिटमध्ये त्यांनी 1994 मध्ये पेशाची सुरवात केली. अखेरच्या श्वासापर्यंत ते माझ्यासोबत राहिले. 

डॉ.रावत यांनी 10 ते 12 दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. ते सुरवातीला गृह विलगीकरणात होते. नंतर त्यांची ऑक्सिजन पातळी घसरल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. परंतु, त्यांना यश आले नाही. अखेर 9 मे रोजी डॉ. रावत हे कोरोना विरोधातील लढा हरले. 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT