MLA Aditi Singh 
देश

काँग्रेसने बहिष्कार टाकलेल्या निवडणुकीत एका महिला आमदाराचा चकवा!

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत त्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या (Uttar Pradesh Assembly) उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीवर काँग्रेसने (Congress) बहिष्कार टाकला आहे. लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसनं हे पाऊल उचललं. त्यानंतर आमदारांसह नेत्यांनी सभागृहाबाहेर आंदोलन सुरू केलं. पण बाहेर आंदोलन सुरू असताना काँग्रेसच्या एका महिला आमदारानं विधानसभेत जाऊन मतदान केलं.

आदिती सिंग (MLA Aditi Singh) असं या आमदारांचं नाव आहे. त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या रायबरेली मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांनी बंडखोरी करत या निवडणुकीवर बहिष्कार असूनही मतदार केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार नाही. त्यामुळे आदिती सिंग यांनी कुणाला मतदान केलं, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ सात उमेदवार विजयी झाले होते. त्यापैकी आदिती या आहेत.

आदिती सिंग यांच्यावर मागील काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. त्या उघडपणे पक्षाविरोधात बोलत असतात. त्यामुळे त्यांना महिला विंगच्या सरचिटणीस पदावरूनही हटवण्यात आलं आहे. त्या पहिल्यांदाच आमदार झाल्या असल्या तरी त्यांचे वडील सहावेळा काँग्रेसचे आमदार होते. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत त्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपपुरस्कृत उमेदवाराला की समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं, यावर त्यांची राजकीय वाटचाल ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विधानसभेची निवडणूक (Assembly Election) सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. भाजपची सत्ता असलेल्या या राज्यांतील नागरिकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी अटीतटीची ठरणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खेळी करत भाजपने उपाध्यक्ष पदाची निवडणूक अपरिहार्य केली आहे. उत्तर प्रदेशच्या इतिहासात विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी मतदान घेण्याची दुसऱ्यांदा वेळ आली आहे. येथील राजकीय परंपरेनुसार विधानसभेचे अध्यक्षपद सत्ताधारी पक्षाकडे तर उपाध्यक्ष पद मुख्य विरोधी पक्षाकडे दिले जाते. 1984 नंतर उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झालेली नाही.

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत असल्याने भाजपकडून उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार उतरवण्यात आला आहे. विरोधकांना एकही संधी न देण्याची खेळी भाजपने खेळली आहे. भाजपने ज्येष्ठ नेते नरेश अग्रवाल (Naresh Agrawal) यांचे पुत्र नितीन अग्रवाल (Nitin Agrawal) यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. भाजप समर्थित उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नितीन हे सध्या अधिकृतपणे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. नरेश अग्रवाल काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पण अद्याप नितीन यांचा अधिकृत प्रवेश झालेला नाही. त्यामुळे आता नितीन यांनीही भाजपचा पाठिंबा घेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं समाजवादी पक्षाला धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT