Ali Akbar
Ali Akbar 
देश

बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर दिग्दर्शकाने केली धर्मांतराची घोषणा; कारण...

सरकारनामा ब्युरो

कोची : मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अली अकबर (Ali Akbar) यांनी मुस्लीम (Muslim) धर्माचा त्याग करत आपण धर्मांतर करणार असल्याची घोषणा केली आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या अपघाती मृत्यूचा आनंद साजरा करणाऱ्यांचा निषेध करत इस्लाम सोडत असल्याची घोषणा केली आहे. आपल्या पत्नीशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी ल्युसायमा यांच्यासह धर्मांतर करणार असल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, अली अकबर (Ali Akbar) यांनी यापूर्वी सीडीएस बिपिन रावत यांच्या मृत्यूची खिल्ली उडवणाऱ्या इस्लामवाद्यांवर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर द्वेषपूर्ण टिप्पण्या आल्याने अकबर यांचे खाते एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर दिग्दर्शकाने दुसरे खाते उघडले आणि आपण इस्लाम सोडत असल्याचे जाहीर केले.

अकबर म्हणाले, “ज्यांनी इमोजी टाकल्या त्यांच्या विरोधात बोलल्यानंतर पाच मिनिटांतच खाते ब्लॉक करण्यात आले. मी ते स्वीकारू शकत नाही, मी ते मान्य करू शकत नाही, म्हणून मी माझा धर्म सोडत आहे. मला किंवा माझ्या कुटुंबाला आता धर्म नाही. हाच निर्णय आहे.” अली अकबर यांचं नवं नाव राम सिंग असणार आहे, असं वृत्त ऑप इंडिया वेबसाईटनं प्रसिद्ध केलं आहे.

यासोबतच, मुस्लीम समाजातील लोकांच्या या कृत्यावर धर्मातील वरिष्ठ नेत्यांनीही अशा कृत्यांचा निषेध नोंदवलेला नाही, याचादेखील अली अकबर यांनी निषेध केला आहे. भारतीय संरक्षण दलाच्या वरिष्ठ मृत्यूवर अशा प्रतिक्रीय निषेधार्ह आहेत, अशा शब्दांत अली अकबर यांनी फेसबूकवर व्हिडीओ पोस्ट करत निषेध व्यक्त केला.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी म्हटंल आहे, की आज मी मला जन्मापासून मिळालेली ओळख फेकून देत असून आजपासून मी मुस्लीम नसून मी भारतीय असल्याचं म्हटलं आहे. तसेच, बिपीन रावत यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी या पोस्टमधून केली आहे. दरम्यान, या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. यात एका गटाने अली अकबर याचं समर्थन केलं आहे तर काहींनी त्यांच्या विरोधात कमेंट केल्या आहेत. अली अकबर अली केरळ भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य होते. मात्र, पक्ष नेतृत्वासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT