Arvind Kejariwal
Arvind Kejariwal  
देश

छट पूजेवरून आप-भाजपमध्ये राजकारणाचा फड

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : बिहारी (Bihar) व पूर्व उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांधवांसाठी महत्वाचा सण असलेल्या छट पूजेवरून यंदा दिल्लीत (Delhi) जोरदार राजकीय खडाजंगी सुरू झाली आहे. यंदा कोरोना कमी झाल्याने यमुना काठांवर छटपूजेला (Chhat Puja) परवानगी द्यावी असे पत्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejariwal) यांनी उपराज्यपाल अनिल बैजल यांना पाठविले आहे. तर दिल्ली भाजपने यावरून मुख्यमंत्र्यांच्याच घराच्या बाहेर आंदोलने सुरू केली आहेत. छटपूजेवरून राजकारणाचा फड रंगण्याचा नवा अध्याय यंदा लिहीला जात आहे.

मुख्यमंत्री दिल्लीतील कोरोना नियंत्रण व व्यवहारंना परवानगी देण्याबाबतची आपली जबाबदारी उपराज्यपालांवर ढकल आहेत असे भाजपचे म्हणणे आहे. यावरून मंगळवारी भाजपने मुख्यमंत्री निवासस्थानाबेहर जोरदार प्रदर्शने केली. यावेळी भोजपुरी गायक-अभिनेते, भाजप खासदार मनोज तिवारी जखमी झाल्याचा भाजपचा दावा आहे. तवारी यांना नंतर सफदरजंग रूग्णालयांत नेण्यात आले. संसदेत दिल्लीबाबतचा नवा कायदा अभूतपूर्व गदारोळात मोदी सरकारने मंजूर करून घेतला त्यानंतर दिल्लीतील प्रत्येक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राजय सरकारला केंद्रनियुक्त उपराज्यपालांची परवानगी घेणे बंधनकारक ठरले आहे याची आठवण सत्तारूढ आपने करून दिली आहे.

दिल्लीतील बहारी- उत्तर प्रदेशातील नागरिकांची संख्या किमान तब्बल ४० लाखांवर आहे. यमुनेच्या पलीकडे यांची मोठी वस्ती आहे. दिल्लीतील इलेक्ट्रॉनिक माध्यमे, नोकरशाहीतही बिहारी-सीमावर्ती उत्तर प्रदेशी नागरिकांचा दबदबा आहे. हे लोक दरवर्षी यमुनेच्या काठावर लाखोंच्या संख्येने जाऊन छट पूजा साजरी करतात. मागील वर्षी कोरोनामुळे या पूजेला परवानगी नव्हती. यावेळी प्रचंड गर्दी जमत असल्याने यंदाही अद्याप ती मिळालेली नाही. मात्र कोरोनाचा कहर दिल्लीत सातत्याने कमी होत आहे. नवीन रूग्णसंख्या काही शेकड्यांवर व मृत्यूसंख्या तर जवळपास शून्यावर आली आहे. त्यामुळे यंदा नियम पाळून छटपूजेला परवानगी द्यावी अशी राजकीय मागणी जोर धरू लागली आहे. साहजिकच यावरून केजरीवाल सरकारवर दबाव आला आहे. केजरीवाल यांनी बैजल यांना पाठविलेल्या पत्रातही कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने छटपूजेला परवानगी द्यावी असे आपले मत असल्याचे म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांना याच मुद्यावरून परवानगी मागणारे पत्र लिहीले आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) कोरोनाच्या दुसऱया लाटेनंतर बाजारपेठा, धार्मिक टिकाणे, काही प्रमाणात शिक्षणसंस्था आदींना परवानगी दिली. मात्र छटपूजेसारख्या समारंभांना परवानगी नाकारली आहे. ती त्वरित मिळावी अशी भाजप व आप या दोघांचीही जाहीर मागणी आहे. मात्र यावेळी प्रचंड गर्दी होते व आरोग्य नियमही पाळले जात नाहीत असा पूर्वानुभव आहे. त्यावरून भविष्यात पुन्हा दिल्लीत महामारीचा उद्रेक होण्याचा धोका निर्माण झाला तर ती जबाबदारी कोणाची याचे उत्तर दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने गुलदस्त्यात ठेवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT