चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला या आज चार वर्षानंतर तमिळनाडूत परतल्या. कर्नाटक सीमेवर समर्थकांनी फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले. शशिकलांचे राज्यात पाऊल पडताच सत्ताधारी अण्णाद्रमुकला पहिलाचा मोठा धक्का बसला आहे. अण्णाद्रमुकचा सहकारी असलेल्या डीएमडीके पक्षाने साथ सोडण्याचा इशारा आज दिला.
आज सकाळी जयललिता यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून शशिकला बंगळूरमधून निघाल्या. अण्णाद्रमुकने विरोध करुनही त्यांनी पक्षाचा ध्वज मोटारीवर लावला होता. त्यांच्या समर्थकांनीही हातात पक्षाचे झेंडे घेतले होते. सुरक्षेसाठी तमिळनाडू-कर्नाटक सीमेवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांनी तमिळनाडूत प्रवेश केल्यानंतर समर्थकांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर फुलांची उधळण केली. रस्त्यातच्या दुतर्फा समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांचे स्वागताचे मोठे फलक लावण्यात आले होते. चेन्नईच्या रस्त्यावरही मोठे फलक लावण्यात आले आहेत. कर्नाटक सीमेवरून त्या थेट चेन्नईकडे रवाना झाल्या.
शशिकलांच्या आगमनाने राज्यातील राज्यातील राजकारण तापले आहे. अभिनेते कॅप्टन विजयकांत यांचा डीएमडीके पक्ष हा अण्णाद्रमुकचा सहकारी पक्ष आहे. विजयकांत यांची प्रकृती बरी नसल्याने पक्षाची धुरा त्यांच्या पत्नी व पक्षाच्या खजिनदार प्रेमलता विजयकांत सांभाळत आहेत. शशिकलांचे राज्यात पाऊल पडताच डीएमडीकेने अण्णाद्रमुकची साथ सोडण्याचा इशारा दिला आहे. पक्षाने स्वबळावर निवडणूक लढल्यास 10 ते 15 टक्के मते मिळतील, असा दावाही करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रेमलता यांनी शशिकलांचे जाहीर कौतुक केले होते.
येथे एका पक्षाच्या मेळाव्यात बोलताना प्रेमलता विजयकांत म्हणाल्या की, राज्यातील सर्व 234 विधानसभा मतदारसंघात स्वबळावर लढणे डीएमडीकेसाठी मोठी बाब नाही. सर्व मतदारसंघात आम्ही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कॅप्टन विजयकांत अण्णाद्रमुकशी आघाडीचा निर्णय घेण्यास एक सेकंदापेक्षाही कमी वेळ लावतील. मात्र, ते आघाडी धर्माचे पालन करीत आहेत. परंतु, आमच्या सहनशीलतेलाही अंत आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्या बंगळूरमध्ये विश्रांती घेत होत्या.
Edited by Sanjay Jadhav
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.