Donald Trump  Sarkarnama
देश

Donald Trump : भारतीयांची चिंता वाढली! ट्रम्प प्रशासनाकडून व्हिसा अपॉइंटमेंट तडकाफडकी बंद; समोर आले हे मोठे कारण!

US visa appointment cancellation latest news : ट्रम्प प्रशासनाकडून अमेरिकेच्या व्हिसा अपॉइंटमेंटबाबत मोठा निर्णय. भारतीय व्हिसा अर्जदारांवर याचा काय परिणाम होणार? जाणून घ्या कारण आणि ताज्या अपडेट्स.

Rashmi Mane

US Pauses All Immigrant Visa Appointments : अमेरिकेत शिक्षण किंवा नोकरीसाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या भारतीयांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जगभरातील अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांमधील इमिग्रंट व्हिसा अपॉइंटमेंट्सच्या वेळापत्रकात अचानक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच व्हिसा मुलाखतीची तारीख निश्चित केलेल्या अर्जदारांनाही नव्या तारखेची प्रतीक्षा करावी लागू शकते.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जगभरातील कॉन्सुलर अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या प्रशिक्षणादरम्यान व्हिसा अपॉइंटमेंट्सच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, ही प्रक्रिया नेमकी किती काळ सुरू राहणार, याबाबत प्रशासनाने अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले की, या प्रशिक्षणाचा उद्देश व्हिसा अर्जांची अधिक प्रभावी आणि सुसंगत पद्धतीने छाननी करण्यासाठी कॉन्सुलर अधिकाऱ्यांना तयार करणे हा आहे. विशेषतः भविष्यात अमेरिकी सरकारी सुविधांवर अवलंबून राहण्याची शक्यता असलेल्या अर्जदारांचे मूल्यांकन अधिक बारकाईने करण्यावर भर दिला जाणार आहे.

माहितीनुसार, काही अर्जदारांना अमेरिकी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांकडून ईमेल पाठवण्यात आले आहेत. त्यामध्ये आधी ठरलेली इमिग्रंट व्हिसा मुलाखतीची वेळ बदलण्यात येत असून, नवीन तारीख नंतर कळवली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

ट्रम्प प्रशासनाच्या कठोर इमिग्रेशन धोरणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. अमेरिकेत व्हिसा आणि ग्रीन कार्ड प्रक्रियेची कडक तपासणी, अर्ज फेटाळणे आणि काही प्रकरणांमध्ये आधी मंजूर केलेले व्हिसा रद्द करण्यासारख्या कारवाया सुरू आहेत. राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने हे निर्णय घेतले जात असल्याचे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे.

दरम्यान, ट्रम्प प्रशासनाच्या काही इमिग्रेशन धोरणांना न्यायालयात आव्हानही देण्यात आले आहे. एका अमेरिकी न्यायाधीशांनी 75 देशांतील अर्जदारांना स्थलांतरित व्हिसा देण्यावर निर्बंध आणणारे धोरण रद्द केले. हे पाऊल परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्या कायदेशीर अधिकारक्षेत्राबाहेरचे असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

याशिवाय, अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज केलेल्या किंवा आश्रय मागत असलेल्या सुमारे 2 लाख परदेशी नागरिकांचे व्यवसाय आणि पर्यटन व्हिसा रद्द करण्याची तयारी प्रशासन करत असल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे अमेरिकेचा व्हिसा मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय विद्यार्थी, कामगार आणि इतर अर्जदारांच्या चिंता वाढल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT